तलाव भरल्याने महिगावचा पाणीप्रश्‍न सुटला 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

""सकाळ रिलीफ फंडातून तलावातील गाळ काढल्याने महिगाव परिसरातील विहिरीही तुडूंब भरल्या आहेत. ग्रामस्थांनी लोकसहभाग दाखवल्याने आगामी काळात पाणीटंचाई जाणवणार नाही.''  
जयश्री गिरी  तनिष्का गटप्रमुख व सदस्या,  पंचायत समिती, जावळी.

सायगाव  - महिगाव (ता. जावळी) येथील ग्रामस्थांना उन्हाळ्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत होते. तनिष्कांच्या मागणीनुसार सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यामातून तलावातील गाळ काढल्याने तलाव भरून वाहू लागला आहे. त्यामुळे गावचा पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला आहे. 

दर वर्षी शेतीसह पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई होत होती. मात्र, पंचायत समितीच्या सदस्या जयश्री गिरी यांच्या पुढाकाराने गावात तनिष्का गट स्थापन झाला. त्यातूनच तनिष्कांच्या मागणीनुसार सकाळ रिलीफ फंडातून मिळालेल्या दोन लाख रुपयांच्या निधीतून डोंगराच्या कडेला असलेल्या तलावातील गाळ काढला. पहिल्याच पावसात तुडूंब भरलेल्या तलावामुळे टंचाई कमी होणार असल्याने शेतकरी आनंदले आहेत. 

तलावतील गाळ काढल्यामुळे मोठा पाणीसाठा झाला असून, परिसरातील विहिरी, बोअरवेलच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. अनेक विहिरी भरल्या आहेत. त्यामुळे पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. तनिष्कांसह ग्रामस्थांनी येथील तलावात श्रमदानही केले. परिसर सुशोभित करण्यासाठी तनिष्कांबरोबर मोलाचा वाटा उचलला. तलाव पाण्याने पूर्ण क्षमतेने भरला असल्यामुळे ग्रामस्थांकडून तनिष्का व "सकाळ'चे कौतुक करण्यात येत आहे. पाणीप्रश्न मिटल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

सकाळ रिलीफ फंडातून तलावातील गाळ काढण्यात आल्यानंतर ग्रामस्थांनीही इतर तलावांमध्ये श्रमदान करून तलाव स्वछता काम हाती घेतल्यामुळे पाणीसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. "सकाळ'च्या कामामुळे आम्हाला प्रेरणा मिळाली, असे ग्रामस्थांनी सांगितले. 

 

Web Title: satara news water sakal relief fund Tanishka