सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला राष्ट्रीय क्रमवारीत नववे स्थान 

University of Pune
University of Pune

पुणे : विद्येचे माहेरघर हा लौकिक सार्थ ठरविताना पुण्यातील चार विद्यापीठांनी राष्ट्रीय क्रमवारीत पहिल्या शंभर विद्यापीठांमध्ये स्थान मिळविले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राष्ट्रीय क्रमवारीत दहाव्यावरून नवव्या क्रमाकांवर झेप घेतली. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या राष्ट्रीय क्रमवारीत पुण्यातील सिंबायोसिस इंटरनॅशनलने 44वा, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने 52वा आणि भारती विद्यापीठाने 66वा क्रमांक मिळविला. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राष्ट्रीय मूल्यांकनात पुन्हा ठसा उमटविला आहे. गेल्या वर्षी या विद्यापीठाचे देशातील विद्यापीठांमध्ये स्थान दहावे होते. पुणे विद्यापीठ वगळता राष्ट्रीय क्रमवारीत पहिल्या शंभरात राज्यातील एकाही सरकारी विद्यापीठाला स्थान मिळालेले नाही. 

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाद्वारे दरवर्षी देशातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रॅकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) जाहीर केले जाते. यात सर्वसाधारण श्रेणी, विद्यापीठे, महाविद्यालये, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, वैद्यकीय, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुकला आणि विधी अभ्यासक्रमांच्या शिक्षण संस्थांची श्रेणी निश्‍चित केली जाते. त्यासाठी गुणांकन देताना शिक्षक, शैक्षणिक संसाधने, संशोधन, त्याची उत्पादकता, पदवीधरांचे प्रमाण, सर्वसमावेशकता आणि संस्थेविषयी सार्वजनिक मत विचारात घेतले जाते. 

सर्वसाधारण स्थान 16वे 
पुणे विद्यापीठाला यावर्षी सर्वसाधारण यादीत 16वे स्थान मिळाले आहे. गेल्या वर्षी ते 18वे होते. गेल्यावर्षी विद्यापीठाला 52.81 गुण मिळाले होते. ते वाढून यावर्षी 58.34 झाले आहेत. पुणे विद्यापीठापेक्षा वरचे स्थान मिळालेल्या विद्यापीठांमध्ये अनुक्रमे इंडियन इन्स्ट्यिूट ऑफ सायन्स (बंगळूर), जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (दिल्ली), बनारस हिंदू विद्यापीठ (वाराणसी), अण्णा विद्यापीठ (चेन्नई), हैदराबाद विद्यापीठ, जाधवपूर विद्यापीठ (कोलकता), दिल्ली विद्यापीठ, अमृता विश्‍व विद्यापीठ (कोईमतूर) यांचा समावेश आहे. 

पुणे विद्यापीठाला मिळालेल्या गुणांकनामध्ये वाढ झाली असली तरी, समाजामधील शिक्षणतज्ज्ञ, नागरिक यांच्या मनात विद्यापीठाची प्रतिमा उंचावण्यात विद्यापीठ अजूनही फार यश मिळवू शकलेले नाही. सार्वजनिक मत या गटात विद्यापीठाला केवळ 15 गुण मिळाले आहेत. बहि:शाल उपक्रम (आऊटरीच) यामध्ये हे विद्यापीठ कमी पडलेले आहे. 

राष्ट्रीय क्रमवारीत पुणे विद्यापीठ क्रमवारी गुण 
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 9 (58.24) 
- सिंबायोसिस इंटरनॅशनल 44 (44.62) 
- डॉ. डी. वाय. पाटील 52 (43.15) 
- भारती विद्यापीठ 66 (41.71) 

राष्ट्रीय क्रमवारीत विद्यापीठ दहाव्या स्थानावरून नवव्या स्थानावर आले, याचा आनंद आहे. विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्सच्या दिशेने चालले आहे, याचे हे निदर्शक म्हणता येईल. राष्ट्रीय क्रमवारीत पहिल्या दहा विद्यापीठांमध्ये मिळालेले स्थान हे प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सामूहिक यश आहे. 
- डॉ. नितीन करमळकर (कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) 

राष्ट्रीय स्तरावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला नववे स्थान मिळाले ही बातमी माजी विद्यार्थी म्हणून आनंददायी आहे. विद्यापीठाचा आत्मा पीएचडी करणारे संशोधक विद्यार्थी हा असतो. ते जेवढ्या जोमाने संशोधन करतील, तेवढे विद्यापीठाचे स्थान उंचावेल. त्यासाठी विद्यापीठाने या विद्यार्थ्यांना प्रेरक वातावरण आणि सोई सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात. 
- योगेश जोशी (भटनागर पुरस्कार विजेते शास्रज्ञ आणि माजी विद्यार्थी, पुणे विद्यापीठ) 

"भारत रॅंकिंग 2018' (कंसात मानांकन) 
सर्वसाधारण गट 
आयआयटी मुंबई (3) 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (19) 
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेकनॉलॉजी, मुंबई (30) 
आयसर, पुणे (32) 
होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट, मुंबई (41) 
टाटा इन्स्टिट्यूट, मुंबई (49) 
सिम्बायोसिस इंटरनॅशनल, पुणे (67) 
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे (79) 
एसव्हीकेएम नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च, मुंबई ( 82) 
भारती विद्यापीठ, पुणे (93) 
अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे (96) 
गोवा विद्यापीठ, गोवा (98) 

अभियांत्रिकी 
आयआयटी मुंबई 
विश्‍वेश्‍वरय्या नॅशनल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी, नागपूर 
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रिअल टेक्‍नॉलॉजी, मुंबई 
व्हीजेआयटी, मुंबई 
अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे 
डीआयएटी, पुणे 
भारती अभियांत्रिकी अभिमत विद्यापीठ, पुणे 
आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी, पुणे 

विधी व न्याय 
सिंबायोसिस विधी विद्यालय, पुणे 

व्यवस्थापन 
आयआयटी मुंबई 
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, मुंबई 
सिंबायोसिस उद्योग व्यवस्थापन संस्था, पुणे 
एस. पी. जैन व्यवस्थापन-संशोधन संस्था, मुंबई 
एसव्हीकेएम नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च, मुंबई 
भारतीय व्यवस्थापन व उद्योजकता विकास संस्था, पुणे

फर्ग्युसन, सीओईपीही राष्ट्रीय क्रमवारीत
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय क्रमवारीत महाविद्यालयांमध्ये फर्ग्युसन महाविद्यालयासह पुण्यातील तीन शैक्षणिक संस्थांनी पहिल्या शंभर क्रमांकात स्थान पटकाविले आहे. राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड बायोटेक्‍नॉलॉजी आणि भारती विद्यापीठ फाइन आर्टस या दोन महाविद्यालयांचा यात समावेश आहे. अभियांत्रिकीमध्ये शासकीय अभियांत्रिकी (सीओईपी) महाविद्यालयाने या क्रमवारीत 45 वे स्थान प्राप्त केले आहे.

पुणे विद्यापीठाचे गुणांकन
वर्ष टीएलआर आरपीसी जीओ ओआय पीआर
2018 70.70 43.64 84.55 55.29 15.04
2017 56.39 35.03 85.13 72.26 11.20
(टीएलआर : टीचर, लर्निंग रिसोर्सेस । आरपीसी : रिसर्च प्रॉडक्‍टिव्हिटी, इम्पॅक्‍ट, आयपीआर । जीओ : ग्रॅज्युएशन आउटकम । ओआय : आउटरिच अँड इन्क्‍ल्युझिव्हिटी । पीआर : परर्सेप्शन)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com