पाचवी-आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल अखेर जाहीर | Scholarship Exam Result | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Scholarship Exam

पाचवी-आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल अखेर जाहीर

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे ऑगस्ट २०२१ मध्ये घेतलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या परीक्षेचा अंतिम निकाल आणि शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या शुक्रवारी जाहीर करण्यात आल्या आहेत. या शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता पाचवीचे ५७ हजार ३३४, तर आठवीचे २३ हजार ९६२ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यातील इयत्ता पाचवीचे १४ हजार २५० आणि आठवीचे १० हजार ७३६ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक असणार आहेत. (Scholarship Exam Result)

परीक्षा परिषदेच्या वतीने ही शिष्यवृत्ती परीक्षा १२ ऑगस्ट २०२१ रोजी मुंबई वगळता संपूर्ण राज्यात घेण्यात आली. परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल २४ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला, तर गुणपडताळणीसाठी २४ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत अर्ज संबंधित शाळेमार्फत ऑनलाइनद्वारे मागविले होते.

हेही वाचा: कैद्याचे मृत्यू प्रकरण : कोल्हापूरात सहा जणांवर खूनाचा गुन्हा

परिषदेने दिलेल्या मुदतीत ऑनलाइन आलेल्या परिपूर्ण अर्जांवरून संबंधित विद्यार्थ्यांच्या गुणांची पडताळणी केली. गुणपडताळणीसाठी आलेले अर्ज निकाली काढून या परीक्षांचा अंतिम निकाल तयार केला आहे. या निकालावरून शासनमान्य मंजूर संचांच्या अधीन राहून विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे.

‘‘शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतिम गुणपत्रकाची प्रत परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. छापील गुणपत्रक व प्रमाणपत्र लवकरच शाळांना पोचविण्यात येतील. तसेच, शिष्यवृत्ती रक्कम प्रदान करण्याबाबत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयाकडे गुणवत्ता यादीतील संबंधित विद्यार्थ्यांची शिफारस करण्यात येत आहे. शिष्यवृत्ती रकमेबाबत यापुढील पत्रव्यवहार त्यांच्या कार्यालयाकडे करण्यात यावा’’, असे परीक्षा परिषदेचे आयुक्त एच.आय. आतार यांनी स्पष्ट केले.

शिष्यवृत्ती परीक्षेची सांख्यिकीय माहिती :

परीक्षेचे नाव : नोंदणी केलेले विद्यार्थी : उपस्थित विद्यार्थी : अनुपस्थित विद्यार्थी : पात्र विद्यार्थी : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी : पात्र विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार टक्केवारी)

इयत्ता पाचवी : ३,८८,५१५ : ३,३७,३७० : ३७,८७१ : ५७,३३४ : १४,२५० : १६.९९ टक्के

इयत्ता आठवी : २,४४,३१४ : २,१०,३३८ : २२,८१४ : २३,९६२ : १०,७३६ : ११.३९ टक्के

एकूण : ६,३२,८२९ : ६,३१,०१४ : ६०,६८५ : ८१,२९६ : २४,९८६ :१४.२० टक्के

निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळ :

- www.mscepune.in

- https://www.mscepuppss.in/

- असा पहा निकाल : संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचा वैयक्तिक बैठक क्रमांक टाका.

हेही वाचा: जपानमधून व्हिसीद्वारे शपथ : प्रतिज्ञापत्र न्यायालयाने धरले ग्राह्य

राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकाविलेले विद्यार्थी :

*इयत्ता पाचवी :

विभाग : विद्यार्थ्याचे नाव

  • - शहरी विभाग : स्वराज चव्हाण (सी. एस. हायस्कूल वडूज, सातारा)

  • - ग्रामीण विभाग : तनिष्का गायकवाड (जिल्हा परिषद शाळा,तळेगाव, पुणे)

  • - सीबीएसई/आयसीएसई शाळांचे विद्यार्थी : निरंजन तोरडमल (पोदार इंटरनॅशनल स्कूल, सातारा)

*इयत्ता आठवी :

विभाग : विद्यार्थ्याचे नाव

  • - शहरी विभाग : श्रावणी धस (वसुंधरा प्राथमिक विद्यालय, आष्टी, बीड)

  • - ग्रामीण विभाग : उमर शेख (नूतन एमव्ही युएमव्ही, मिरजगाव, नगर)

  • - सीबीएसई/आयसीएसई शाळांचे विद्यार्थी : प्राजक्ता चव्हाण (विद्यानिकेतन ॲकॅडमी, नगर)

शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालाचे संकेतस्थळ मंदावले

शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता जाहीर करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती निकाल, गुणवत्ता याद्या पाहण्यासाठी संकेतस्थळ ओपन करण्यात येत होते. एकाच वेळी अनेकांकडून हे संकेतस्थळ सर्च होत होते.

त्यामुळे संकेतस्थळाची लिंक ओपन करूनही विद्यार्थ्यांचा निकाल पाहण्यासाठी खूप वेळ प्रतीक्षा करावी लागल्याचे चित्र पहायला मिळाले. ‘‘संकेतस्थळाला कोणतीही अडचण उद्भवलेली नाही. एकाच वेळी लाखो लोक संकेतस्थळ पाहत असावेत, म्हणून निकाल पाहण्यास काहीसा वेळ लागत असावा,’’ असे स्पष्टीकरण राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने देण्यात आले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top