esakal | शाळा 31 मार्चपर्यंत राहणार बंदच ! 12 दिवसांत राज्यात वाढले सव्वालाख रुग्ण; 539 जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

2lockdown_67.jpg

निर्बंधाचे असे असेल स्वरूप 

 • रात्री 11 ते पहाटे पाचपर्यंत कायम राहणार रात्रीची संचारबंदी 
 • शाळा-महाविद्यालये (दहावी-बारावी वगळून) 31 मार्चपर्यंत बंदच ठेवली जाणार 
 • विवाह, अंत्यविधीसाठी केवळ 50 जणांनाच परवानगी; विवाहासाठी पोलिसांच्या ना हरकत प्रमाणपत्राचे बंधन 
 • हॉटेल्स, दुकाने, बिअर बार हे 50 टक्‍के क्षमतेने रात्री दहा वाजेपर्यंतच सुरु ठेवली जातील 
 • हॉटेलबाहेर आतील ग्राहकांची संख्या दर्शविणारे फलक बंधनकारक; रात्री अकरापर्यंत होम डिलिव्हरीला परवानगी 
 • गृहनिर्माण सोसायट्यांमधील क्‍लब हाऊस राहणार बंद; उद्याने सायंकाळी राहणार बंद 

शाळा 31 मार्चपर्यंत राहणार बंदच ! 12 दिवसांत राज्यात वाढले सव्वालाख रुग्ण; 539 जणांचा मृत्यू

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : राज्यात दररोज सरासरी नऊ ते दहा हजारांच्या सरासरीने रुग्ण वाढत आहेत. काही जिल्ह्यांचा मृत्यूदरही वाढू लागला आहे. तरीही, पुन्हा राज्यभर कडक लॉकडाउन आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्याने निर्बंध कडक केले जाणार आहेत. मार्चमध्ये राज्यभरात तब्बल सव्वालाख रुग्ण वाढले असून तब्बल 539 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हाताबाहेर जाणारी परिस्थिती आटोक्‍यात आणण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यांत कडक निर्बंध राज्यभर लागू केले जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील शाळा 31 मार्चपर्यंत बंद ठेवल्या जाणार आहेत.

निर्बंध कडक केले जाणार; नियमांचे पालन करावेच लागेल 
राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाउन करणे परवडणारे नाही. त्यामुळे कडक निर्बंध आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करूनच कोरोनाला आटोक्‍यात आणण्याचे नियोजन आहे. त्यासंबंधी गुरुवारी अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. 
- दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री तथा पालकमंत्री, सोलापूर 

कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाल्यापासून नियमांचे उल्लंघन वाढले आहे. राज्यातील 14 जिल्हे पुन्हा एकदा कडक लॉकडाउनच्या उंबरठ्यावर पोहचले असून आर्थिकदृष्ट्या आता कडक लॉकडाउन शक्‍य नसल्याने सरकारने त्यावर कडक निर्बंधाचा उपाय शोधला आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात को-मॉर्बिड रुग्णांना लस टोचली जात आहे. तरीही 50 वर्षांवरील व्यक्‍तींच कोरोनाचे सर्वाधिक बळी ठरत असून मार्चमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 539 जणांमध्ये 360 हून अधिक को-मॉर्बिड रुग्ण आहेत. दुसरीकडे पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सांगली, कोल्हापूर, नंदूरबार, लातूर, हिंगोली, उस्मानाबाद, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये या महिन्यांत एक हजार ते 19 हजारांनी रुग्णसंख्या वाढली आहे. 1 ते 12 मार्च या काळात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 22 हजार 538 तर दुसऱ्या क्रमांकावर नागपूर असून त्याठिकाणी 16 हजार 266 रुग्ण वाढले आहेत. मुंबईत 13 हजार 518, ठाण्यात साडेनऊ हजार, नाशिकमध्ये सहा हजार 985, जळगाव जिल्ह्यात सहा हजार 878, अमरावतीत सहा हजार 16, अकोला, परभणीत पत्येकी चार हजारांपर्यंत तर औरंगाबादमध्ये साडेचार हजार, वर्धा, यवतमाळ, नगर, रायगड, जालना, नाशिक या जिल्ह्यांमध्येही प्रत्येकी दोन ते अडीच हजारांची रूग्णवाढ झाली आहे. दुसरीकडे 1 मार्च रोजी राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 77 हजारांपर्यंत होती. आता सक्रिय रुग्णांनी एक लाख 10 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. 

निर्बंधाचे असे असेल स्वरूप 

 • रात्री 11 ते पहाटे पाचपर्यंत कायम राहणार रात्रीची संचारबंदी 
 • शाळा-महाविद्यालये (दहावी-बारावी वगळून) 31 मार्चपर्यंत बंदच ठेवली जाणार 
 • विवाह, अंत्यविधीसाठी केवळ 50 जणांनाच परवानगी; विवाहासाठी पोलिसांच्या ना हरकत प्रमाणपत्राचे बंधन 
 • हॉटेल्स, दुकाने, बिअर बार हे 50 टक्‍के क्षमतेने रात्री दहा वाजेपर्यंतच सुरु ठेवली जातील 
 • हॉटेलबाहेर आतील ग्राहकांची संख्या दर्शविणारे फलक बंधनकारक; रात्री अकरापर्यंत होम डिलिव्हरीला परवानगी 
 • गृहनिर्माण सोसायट्यांमधील क्‍लब हाऊस राहणार बंद; उद्याने सायंकाळी राहणार बंद 
 •  
loading image