दुसऱ्या लाटेपर्यंत लागू राहणार 'जनआरोग्य' योजना ! रुग्णांना 'असा' घेता येईल योजनेचा लाभ

3benefit_of_mahatma_phule_jan_arogya_yojana_akl_202005427415 - Copy.jpg
3benefit_of_mahatma_phule_jan_arogya_yojana_akl_202005427415 - Copy.jpg

सोलापूर : कोरोनाच्या संकट काळात महात्मा फुले जनआरोग्य योजना गोरगरिब रुग्णांसाठी वरदान ठरली आहे. योजनेअंतर्गत कोविड केअर सेंटर व संबंधित रुग्णालयांमधून तब्बल 13 लाख 42 हजारांहून अधिक रुग्णांवर आठ हजार 420 कोटी रुपयांचे मोफत उपचार झाले आहेत. सोलापूर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक, पुणे, जळगाव, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, औरंगाबाद, बीड, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, नांदेड, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांमधील सर्वाधिक रुग्णांना योजनेचा लाभ मिळाला आहे. ही योजना दुसऱ्या लाटेपर्यंत सर्वच रुग्णांसाठी लागू असेल, असेही वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.

अजूनही योजनेतून सर्वच रुग्णांवर मोफत उपचार
कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून सुमारे दहा लाख तर रुग्णालयातून साडेतीन लाख रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून लाभ देण्यात आला आहे. खासगी रुग्णालयांनी मोठ्या प्रमाणावर सहकार्य केल्याने सर्वसामान्य रुग्णांना योजनेचा अधिक लाभ झाला. दरम्यान, या योजनेतून अद्याप सर्वच प्रवर्गातील रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत.
- डॉ. सुधाकर शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जनआरोग्य योजना


राज्यात कोरोनाचा प्रवेश झाल्यानंतर केंद्र सरकारने लॉकडाउन जाहीर केला. या काळात उपचाराच्या खर्चाचा भार पेलवणे सर्वसामान्यांना कठीण झाले होते. त्यामुळे केंद्र सरकारने कोरोना रुग्णांसाठी आयुष्यमान भारत, तर राज्य सरकारने महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू केली. पाच लाखांपर्यंत लाभ मिळणाऱ्या आयुष्यमान भारत योजनेतून एकालाही लाभ मिळाला नाही. मात्र, जनआरोग्य योजनेतून मोठ्या प्रमाणावर रुग्णांना लाभ देण्यात आला. योजनेअंतर्गत नऊशेहून अधिक रुग्णालये असून ज्या- त्या जिल्ह्यांची गरज पाहून योजनेतील रुग्णालयांमधून कोविड रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोना काळात काही रुग्णालयांकडून ज्यादा बिले घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ऑडीटर नियुक्‍तीचा निर्णय घेतला. लेखापरीक्षकांद्वारे सुमारे आठ ते दहा हजार रुग्णांना बिलातील ज्यादा रक्‍कम परत केल्याची माहिती महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली. रुग्णालयांकडून रुग्णांची माहिती अपलोडिंगसाठी विंलब होत असल्याने लाभार्थ्यांची माहिती तत्काळ समजत नाही. मात्र, सुमारे साडेतेरा लाख रुग्णांना जनआरोग्य योजनेचा लाभ झाल्याचेही सांगण्यात आले.

ठळक बाबी...

  • कोरोना बाधित रुग्णांनी स्वत:चे रेशन कार्ड, आधार कार्ड जवळ ठेवावे
  • जनआरोग्य योजनेतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे
  • त्या रुग्णालयात योजनेचे काम पाहणारा आरोग्य मित्र असेल
  • त्यांच्या माध्यमातून संबंधित हॉस्पिटलमधून जनआरोग्य योजनेचा ऑनलाइन अर्ज भरला जाईल
  • रुग्णांवर मोफत उपचार होतील आणि सरकारकडून त्या रुग्णावरील उपचाराचा खर्च मिळेल

आकडे बोलतात...
कोरोनाचे एकूण रुग्ण
17,44,698
जनआरोग्य योजनेतून उपचार
13.42 लाख
उपचाराची एकूण रक्‍कम
8,420 कोटी
वाढीव बिलाबद्दल तक्रारी
8 ते 10,000
लेखापरीक्षकांनी परत केलेली रक्‍कम
170 कोटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com