राज्यात ज्येष्ठ नागरिक असुरक्षित

अनिश पाटील
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

घरातील ज्येष्ठ नागरिकांना आदराने वागवण्याची संस्कृती असलेल्या महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्हे ज्येष्ठ नागरिकांविरोधात घडत असल्याचे समोर आले आहे.

मुंबई- घरातील ज्येष्ठ नागरिकांना आदराने वागवण्याची संस्कृती असलेल्या महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्हे ज्येष्ठ नागरिकांविरोधात घडत असल्याचे समोर आले आहे. देशातील ज्येष्ठ नागरिकांविरोधात सर्वाधिक म्हणजे पाच हजार ३२१ गुन्हे महाराष्ट्रात घडले आहेत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) २०१७ च्या गुन्हे आकडेवारीतून ही बाब स्पष्ट झाली आहे. २०१६ च्या तुलनेत त्यात वाढ झाली आहे. राज्याची राजधानीही त्याला अपवाद नसून देशातील प्रमुख महानगरांमध्ये मुंबईत ज्येष्ठांविरोधातील सर्वाधिक म्हणजे एक हजार ११५ गुन्हे दाखल झाले आहेत.

ज्येष्ठ नागरिकांबाबत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. २०१५ मध्ये राज्यात चार हजार ५६१, २०१६ मध्ये ६९४; तर २०१७ मध्ये पाच हजार ३२१ गुन्हे दाखल झाले आहेत. २०१७ मध्ये राज्यात १५२ ज्येष्ठ नागरिकांच्या हत्या महाराष्ट्रात घडल्या. हत्यांबाबत तमिळनाडूपाठोपाठ राज्याचा क्रमांक लागतो. याशिवाय ६६ गुन्हे हत्येचा प्रयत्न, २४६ गंभीर मारहाणीचे, ३५५ जबरी चोरीचे व १०१५ फसवणुकीचे गुन्हे वरिष्ठ नागरिकांबाबत घडले. सर्वांत लाजिरवाणी गोष्ट म्हणजे राज्यात २०१७ मध्ये नऊ ज्येष्ठ नागरिक महिलांवर बलात्कार झाला आहे. केरळमध्ये सर्वाधिक १९ ज्येष्ठ नागरिक महिलांवर बलात्कार झाले आहेत.

मुंबईही वरिष्ठ नागरिकांविरोधातील गुन्ह्यांमध्ये देशात आघाडीवर आहे. मुंबईत २०१७ मध्ये एक हजार ११५ गुन्हे घडले आहेत. २०१६ मध्ये १२१८ गुन्हे घडले होते; तर २०१४ मध्ये ९४४ व २०१५ मध्ये ११२१ गुन्हे ज्येष्ठ नागरिकांविरोधात घडले होते. उतारवयात ज्येष्ठ नागरिकांना दररोजच्या कामासाठी नोकर व इतर व्यक्तींवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे त्यांना टार्गेट करणे आरोपींना सोपे जाते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिकांविरोधातील गुन्हे रोखण्यासाठी १०९० क्रमांकाच्या हेल्पलाईवर नोंदणी होते. या हेल्पलाईनवर दर महिन्याला किमान ५० नोंदणी केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे तक्रारीचे दूरध्वनी असल्‍याचे पोलिसांनी सांगितले.

मुलांकडून पोटभर जेवणही मिळेना!
मुले जेवण देत नाहीत, लाऊड स्पीकरच्या आवाजाचा त्रास होतोय, शेजारी त्रास देत आहेत अशा तक्रारी या हेल्पलाईवर येतात. गुन्हेगारी स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये पोलिस गुन्हे दाखल करतात; तर इतर प्रकरणांमध्येही वृद्ध नागरिकांना पोलिस मदत करण्याचा प्रयत्न करतात. याशिवाय वैद्यकीय सेवेची आवश्‍यकता असेल तेव्हाही पोलिस ज्येष्ठ नागरिकांना मदत करतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Senior citizens in the state are insecure