ज्येष्ठ लेखिका गिरिजा कीर यांचे निधन

उत्कर्षा पाटील
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

ज्येष्ठ लेखिका गिरिजा कीर यांचे (वय 86) गुरुवारी वांद्रे मधील साहित्य सहवास येथे दीर्घ आजाराने निधन झाले.

मुंबई : कथा, कादंबरी, बालसाहित्य अशा विविध वाङ्मयप्रकाराातून समृद्ध लेखन करणाऱ्या ज्येष्ठ लेखिका गिरिजा कीर यांचे (वय 86) गुरुवारी वांद्रे मधील साहित्य सहवास येथे दीर्घ आजाराने निधन झाले. त्याच्या पश्चात दोन मुले, सुना, नाती आणि पणतू असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रात्री शीव स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गिरिजाघर, देवकुमार, चांदण्याचं झाड, चंद्रलिंपी, चक्रवेध, स्वप्नात चंद्र ज्याच्या, आभाळमाया, आत्मभान, झपाटलेला या गिरिजा कीर यांच्या कादंबऱ्या लोकप्रिय आहेत. गाभाऱ्यातील माणसं, जगावेगळी माणसं, कलावंत, साहित्य सहवास ही त्यांची व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके आहेत. त्यांनी बालसाहित्यावरही बरेच लेखन केले आहे. गिरिजा कीर या उत्कृष्ट कथाकथनकार म्हणूनही प्रसिद्ध होत्या. त्यांचे दोन हजाराहून अधिक कथाकथनाचे कार्यक्रम देशा-परदेशात झाले आहेत.

किर्लोस्कर, प्रपंच, ललना या मासिकातून गिरिजा कीर यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या. त्यांची एकूण 85 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यात कथा, कादंबरी, मुलाखती, प्रवासवर्णने, बालसाहित्य इत्यादी साहित्य प्रकारांचा समावेश आहे. 1968 ते 1978 या काळात अनुराधा मासिकाची साहाय्यक संपादिका काम केले. हे काम करीत असताना सामाजिक प्रश्नांसंबंधीच्या प्रेमापोटी कामगार वस्ती, कुष्ठरोग्यांची वस्ती आणि आदिवासी भागात जाऊन त्यांनी त्यांच्या जीवनाचा जवळून अभ्यास केला. गिरिजा कीर यांचे प्रकाशित झालेले "जन्मठेप" हे पुस्तक त्यांनी 6 वर्षे येरवडा तुरुंगातील जन्मठेप झालेल्या कैद्यांवर संशोधन करून लिहिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Senior Litterateur Girija Kiir Dies at 86

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: