मानापमान बाजूला ठेवला अन् माजी मुख्यमंत्री पवारांच्या मंत्रिमंडळात सामील झाले Devendra Fadanvis | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sharad pawar shanakrrao chavan

मानापमान बाजूला ठेवला अन् माजी मुख्यमंत्री पवारांच्या मंत्रिमंडळात सामील झाले

राज्यात गेल्या ४८ तासांमध्ये प्रचंड वेगाने घडामोडी घडल्या आहेत. सत्तानाट्याच्या या अंकामध्ये देवेंद्र फडणवीस पुन्हा येण्याची शक्यता असतानाच एक वेगळाच ट्विस्ट आला. फडणवीस आले, पण उपमुख्यमंत्री पदी आणि मुख्यमंत्री पद मिळालं एकनाथ शिंदेंना. याच सगळ्या घडामोडींवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Maharashtra Politics News)

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, बिचारे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा केंद्रातील नेतृत्वाने शंकरराव चव्हाण केला. दिल्लीहून फडणवीस यांना आदेश आले म्हणून ते उपमुख्यमंत्री झाले म्हणून असं ट्विट मी केलं आहे. फडणवीस यांचा अपमान करायचा होता म्हणून उपमुख्यमंत्री पद दिलं आहे का हे केंद्रात विचारायला हवं.

आता राजकीय वर्तुळात चर्चा चालू आहे की खरंच देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करून केंद्राने त्यांचा अपमान केला आहे का? प्रकाश आंबेडकर म्हणतात तो शंकरराव चव्हाण यांच्या याबाबत नेमकं काय घडलं होतं ? शरद पवार यांनी देखील आपल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये चव्हाण यांचा उल्लेख केला होता. जाणून घेऊ काय आहे नेमकं प्रकरण.

हेही वाचा: शिंदेच्या आग्रहानंतर फडणवीस बनले उपमुख्यमंत्री - चंद्रकात पाटील

शंकरराव चव्हाण म्हणजे नांदेडचे थोर सुपुत्र. मराठवाड्याच्या स्वातंत्र्यसंग्रामात त्यांनी सहभाग घेतलेला. स्वातंत्र्यानंतर नगराध्यक्षपदापासून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरु केली. पुढे आमदार,राज्यमंत्री असे करत करत त्यांनी सत्तरच्या दशकात मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली.

मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात त्यांनी आपल्या पाटबंधारे खात्यातून अनेक कामे मार्गी लावली. शंकरराव चव्हाण यांनी केलेल्या जलसंधारणाच्या कामामुळे त्यांना मराठवाड्याचा भगीरथ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. असे असले तरी चव्हाण यांना आपल्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. पण कठोर प्रशासक म्हणून त्यांनी ही आव्हाने सहज पेलली.

इंदिरा गांधींनी लादलेल्या आणिबाणीसारख्या कसोटीच्या प्रसंगी देखील चव्हाण यांनी आपल्या कार्यकुशलतेचा प्रयत्य दाखवला. पण आणीबाणीनंतर देशभरात आलेल्या काँग्रेस विरोधी लाटेचा फटका त्यांना देखील बसला. शंकरराव चव्हाण यांच्या ऐवजी वसंतदादा पाटलांकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सोपवण्यात आले. पुढे काँग्रेस फुटली. शंकरराव चव्हाण यांनी महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस नावाचा पक्ष स्थापन केला. दुर्दैवाने त्यांच्या या पक्षाला जनतेने साथ दिली नाही. १९७८ सालच्या विधानसभा निवडणुकीत शंकरराव चव्हाण स्वतः पराभूत झाले.

दरम्यानच्या काळात वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातून शरद पवार यांनी बंडखोरी केली. त्यांच्या सोबत जवळपास ३८ आमदार सरकारमधून बाहेर पडले. जनता पक्ष, जनसंघ अशा अनेक पक्षांची मोट बांधून पुरोगामी लोकशाही दल या सरकारची स्थापना करण्यात आली. त्याचं मुख्यमंत्रीपद शरद पवार यांना देण्यात आलं.

हेही वाचा: Prakash Ambedkar यांनी फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यावर काय प्रतिक्रिया दिली ?

शरद पवार यांनी याबद्दलची आठवण लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात सांगितली आहे,

'पुलोद'चं सरकार स्थापन करत असताना, 'शंकरराव चव्हाण यांच्यासारख्या अनुभवी, अभ्यासू माणसाला मंत्रिमंडळात घ्यावं, असा एस. एम. जोशी यांचा आग्रह होता. पराभूत उमेदवारांना मंत्रिमंडळात स्थान नसावं, अशी सूचना मोरारजी देसाई यांची होती. राजारामबापू पाटील त्या वेळी पराभूत झाले होते, त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची माझी इच्छा होती. मोरारजींना हे समजल्यावर त्यांनी, 'हे बरोबर नाही', असं मत मांडलं. मोरारजी मराठीत बोलत आणि 'हे बरोबर नाही हे वाक्य म्हणजे त्यांची खास लकब! ताबडतोब मी मोरारजोना, '१९५२ मध्ये तुम्हीही पराभूत झाला होतात, पण तुम्हाला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली होती, एवढीच आठवण करून दिल्यावर त्यांचा विरोध मावळला.

शंकरराव चव्हाण यांनी देखील आपलं मन मोठं दाखवलं आणि माजी मुख्यमंत्री असूनही शरद पवार यांच्या सारख्या वयाने तरुण असणाऱ्या मुख्यमंत्र्याच्या मंत्रीमंडळात दुय्य्म स्थान स्विकारलं. ते पुलोद सरकारमध्ये अर्थमंत्री बनले. असं सांगितलं जातं की एका पत्रकाराने माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांना शरद पवार यांच्या केबिनबाहेर फाईल हातात घेऊन ताटकळत वाट पाहताना पाहिलं होतं. शंकरराव चव्हाणांनी अपमानाचे हलाहल सहज पचवलं होतं.

स्वच्छ चारित्र्य, कठोर प्रशासकीय पकड आणि प्रामाणिकपणा यांच्या बळावर त्यांची लोकप्रियता पुन्हा भरारी घेऊ लागली. पुढे काही वर्षांनी ते पुन्हा मुख्यमंत्री बनले, एवढावंच नाही तर देशाचे गृहमंत्री, अर्थमंत्री अशी अनेक महत्वाची पदे त्यांनी पुढच्या काळात भूषवली. मुख्यमंत्री पदावरून ह्टल्यावर जर आपला अहंकार ते कुरवाळत बसले असते तर हे यश त्यांना कधीच मिळवता आले नसते हे मात्र खरं.

हेही वाचा: धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची Friendship कधी पासून सुरु झाली ?

Web Title: Shanakrrao Chavan Became Finance Minister In Sharad Pawars Ministry

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..