पंतप्रधानांना पवारांचा फोन; मुख्यमंत्र्यांशी चर्चेचे मोदींचे आश्वासन

मिलिंद संगई
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीबाबत महाराष्ट्र व कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून मार्ग काढतो असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला दिल्याची माहिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज दिली.

बारामती शहर- महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीबाबत महाराष्ट्र व कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून मार्ग काढतो असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला दिल्याची माहिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज दिली.

राज्यातील पूरपरिस्थितीबाबत शरद पवार यांनी पंतप्रधानांशी बोलावे अशी विनंती पूरग्रस्त सांगलीतील नागरिकांनी केली होती. त्या नुसार आज पवार यांनी मोदी यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करुन राज्यातील पूर परिस्थितीच्या भीषणतेची माहिती त्यांना दिली. आलमटी धरणातून पाच लाख क्यूसेक्सने पाणी सोडणे गरजेचे असताना ते पुरेशा प्रमाणात सोडले जात नाही. पाण्याच्या फुगवट्यामुळे सांगलीला पुराचा तडाखा अधिक तीव्रतेने बसला आहे, या संदर्भात नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून मार्ग काढावा अशी विनंती पवार यांनी मोदी यांना केली आहे.

राज्यातील पूरग्रस्तांना केंद्राकडूनही सर्वतोपरी मदतीबाबतही पंतप्रधान सकारात्मक आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही मी या बाबत बोललो असल्याचे पवार यांनी  सांगितले.

कोल्हापूर व सांगलीची परिस्थिती अजूनही फारशी सुधारली नाही. सांगली येथे पलूसनजिक जी दुर्घटना घडली त्या भागाला भेट देण्यासाठी मी उद्या जात असून त्यांच्या गरजा जाणून घेऊन त्या पध्दतीने त्यांना मदत करणार असल्याचेही शरद पवार म्हणाले. चाळीस डॉक्टरांची टीम तयार केलेली असून औषध गोळा केली असून ती पूरग्रस्त भागात पाठवणार आहोत, काही प्रमाणात धान्य व इतरही मदत गोळा केली असून तीही पाठविणार असल्याचे पवार यांनी सांगितले. 

संकटग्रस्तांना मदतीस प्राधान्य...
पूरग्रस्तांना मदत करणे हेच आपले पहिले काम आहे, या परिस्थिती आम्ही कसलेही राजकारण अजिबात करणार नाही, या कठिण प्रसंगी पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे सर्वांचेच काम असून सर्वांनी यात सक्रीय सहभागी व्हावे, असेही आवाहन शरद पवार यांनी केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sharad pawar called to PM; modi assured to talk to cm fadanvis