
शरद पवारांचा घणाघात : भोंगे, चालिसाने प्रश्न सुटणार का?
मुंबई : ‘‘ जात आणि धर्माच्या नावाखाली पुन्हा एकदा देशाला मागे नेण्याचा काहींचा प्रयत्न सुरू असून महागाई, बेरोजगारी यासारख्या ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्याचे डावपेच खेळले जात आहेत. आजच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचीच देशाला गरज आहे. या महापुरुषांचे सर्वसमावेशक विचारच या देशाचा आधार होऊ शकतात.’’ असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विमुक्त जाती, भटक्या जमाती मागासवर्गीय विभागाच्यावतीने कृतज्ञता गौरव सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी पवार म्हणाले ‘‘आज टीव्ही माध्यमांतून सामान्यांच्या प्रश्नाला बगल दिली जात असून कोणाची सभा आहे. हनुमान चालिसाचे काय होणार? भोंग्यांबाबत काय बोलणार? याचीच चर्चा दिवसभर असते. या सगळ्यामुळे बेरोजगारी, महागाई आणि पोटाच्या भुकेचा प्रश्न सुटणार आहे काय? ’’असा सवाल पवार यांनी केला.
शाहू - फुले - आंबेडकरांचे नाव घेतो म्हणून एका नेत्याने टीका केल्याचा उल्लेख करीत पवार म्हणाले की ‘‘आज श्रीलंकेत दंगा सुरू आहे. दुसरीकडे पाकिस्तानमध्ये पंतप्रधानांना पायउतार व्हावे लागले. हिंदुस्थानात अनेक भाषा, अनेक जाती आहेत. तो एकसंघ राहिला याचे कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान आहे.’’
राठोड यांचे कौतुक
विमुक्त जाती, भटक्या जमाती मागासवर्गीय सेलच्यावतीने २८ मागण्या करण्यात आल्या. त्या मागण्या महत्त्वाच्या आहेत. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे आणि जयंत पाटील यांच्यासमवेत सेलचे अध्यक्ष हिरालाल राठोड यांना सोबत घेऊन बैठक घेऊ असे आश्वासन पवार यांनी यावेळी बोलताना दिले.शरद पवार यांनी या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संघटना मजबूत हवी आणि या मजबूत संघटनेला हिरालाल राठोडसारखा नेता हवा अशा शब्दांत त्यांची स्तुती केली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भटक्या विमुक्तांच्या वतीने केलेल्या अनेक मागण्यामध्ये शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. ही मागणी रास्त आहे असे पाटील म्हणाले.
भोंग्यांबाबत शिवसेनाप्रमुखांनी प्रथम आवाज उठविला : ठाकरे
‘भों ग्यांबाबात सगळ्यात आधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आवाज उठविला होता असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप नेत्यांना अप्रत्यक्षपणे फटकारले. हिंदुत्वावर बोलण्याची यांची लायकी नाही. या मंडळींना मराठी आणि हिंदुत्वाबद्दलही प्रेम नसल्याचा घणाघात ठाकरे यांनी केला. शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी शिवसेनेचे आमदार, खासदारांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
शिवसेनेचा विस्तार, नव्याने पक्ष बांधणी, संघटनेचे काम, सध्याची राजकीय स्थिती, तिचे परिणाम आणि शिवसेनेची दिशा यावर ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
धर्म आणि जातीच्या नावाने महाराष्ट्राची बदनामी करण्याचे काम काही असामाजिक संघटना करीत आहेत. मात्र, हे खपवून घेतले जाणार नाही. आम्ही दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढत नाही.
- संजय राऊत, नेते शिवसेना
या देशात आरक्षणावर घाला घातला जात आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकत्र येऊन या बहुजनविरोधी प्रवृत्तीचा बीमोड करायला हवा.
- छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री
Web Title: Sharad Pawar Criticize Loudspeaker Hanuman Chalisa Will Solve The Problem Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..