Vidhan Sabha 2019 : नाकर्त्या सरकारला खाली खेचा - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

कर्जबाजारीपणामुळे १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकरी व उद्योजकांच्या विरोधात काम करणाऱ्या अशा नाकर्त्या सरकारला त्यांची जागा दाखवून खाली खेचा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल केले.

विधानसभा 2019 : 
पारनेर -  ‘‘युती सरकारने अवघ्या ३१ टक्के शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले; मात्र शे-पाचशे उद्योजकांचे ७८ हजार कोटी रुपये केंद्र सरकारने भरले आहेत. तरीसुद्धा अनेक उद्योगधंदे बंद पडत आहेत. हजारो कामगार बेरोजगार होत आहेत. दुसरीकडे, कर्जबाजारीपणामुळे १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकरी व उद्योजकांच्या विरोधात काम करणाऱ्या अशा नाकर्त्या सरकारला त्यांची जागा दाखवून खाली खेचा,’’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल केले. पारनेर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ आज येथे झालेल्या सभेत पवार बोलत होते. दिलीप वळसे पाटील अध्यक्षस्थानी होते.

पवार म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची किंमत मिळत नसेल, तर हा विकास काय कामाचा? तुम्ही शेतीची औजारे, औषधे, खते, बी-बियाणे यांच्या किमती का कमी करीत नाही? कधी तरी शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव आला, तर लगेचच निर्यात बंद केली. शेतकरी कर्जमाफीचाही सरकारने बोजवारा उडविला आहे. जे लोक शेतकऱ्यांना कष्टाची व घामाची किंमत देत नाहीत, अशा लोकांना मते मागण्याचा काय अधिकार आहे?’’ 

पारनेर दुष्काळी तालुका आहे. त्यामुळे अनेक लोक कामधंद्यासाठी गाव सोडून मुंबई, पुणे, औरंगाबाद अशा शहरांत जात आहेत. शेतीची अवस्था गंभीर आहे. मात्र, या सरकारला त्याची जाण नाही. आम्ही अडचणीत आलेल्या सहकारी कारखान्यांना मदत केली, यात आमची काय चूक? केवळ सत्तेचा वापर करून विरोधात बोलणाऱ्यांचे तोंड दाबण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे, असा आरोप पवार यांनी केला. राज्य शिखर बॅंकेचा व माझा काडीचाही संबंध नाही. केवळ माझे व संचालकांचे चांगले संबंध आहेत म्हणून माझ्यावर ‘ईडी’ची कारवाई केली गेली. आम्ही सामान्य जनतेच्या भल्यासाठी जेलमध्येही जाण्यास तयार आहोत, असा इशारा पवार यांनी सरकारला दिला.

उमेदवार नीलेश लंके यांचेही भाषण झाले. ‘‘मी तालुक्‍यातील पाणीप्रश्न, शिक्षण, आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी उभा आहे. लोकांच्या सेवेसाठी मला निवडून द्या,’’ असे ते म्हणाले. माजी खासदार दादा पाटील शेळके, माजी आमदार दादा कळमकर,  माधव लामखडे, उदय शेळके, अशोक सावंत, सबाजी गायकवाड आदींची भाषणे झाली. ‘राष्ट्रवादी’चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. विक्रम कळमकर यांनी सूत्रसंचालन केले.

शेळके, झावरेंचे शरद पवारांकडून स्मरण
गुलाबराव शेळके, वसंतराव झावरे, पोपटराव पवार यांच्यासोबत मी काम केले आहे. पारनेरमध्ये आल्यावर त्यांचे स्मरण आज होत आहे, असे सांगून पवार म्हणाले, ‘‘आम्ही सत्तेत असताना शेतकरी पीकविमा देणारी केवळ एकच कंपनी होती. त्या वेळी सर्व शेतकऱ्यांना भरपाई मिळत असे. या सरकारने अनेक कंपन्या स्थापन करून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे या सरकारला धडा शिकवावा लागेल.’’

हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; दुसरे तातडीने मागितले
प्रचारसभेसाठी आज येथे आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला. तातडीने दुसरे हेलिकॉप्टर मागविण्यात आले. त्यातून पवार दुपारी साडेतीन वाजता जळगावकडे रवाना झाले. सभा सुरू असताना हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याचे पवार यांना कळविण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या हेलिकॉप्टरला उतरण्यासाठी व उड्डाण करण्यासाठी प्रशासनाची परवानगी घेण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या हेलिकॉप्टरने पवार जळगाव िजल्ह्यातील प्रचारसभेला रवाना झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad pawar meeting in parner