'ऑपरेशन लोटस'वर 'पवार पॉवर' भारी !

टीम ई-सकाळ
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

शरद पवार यांच्या निकटवर्तीय नेत्यांनी सातत्याने अजित पवार यांना परतीचे आवाहन केले. याशिवाय, पवार कुटुंबाशी संबंधित अनेक नातेवाईकांनी, हितचिंतकांनी अजित पवार यांना भावनिक साद घातली.

भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'वर पवार कुटुंबांचे भावनिक अपील भारी पडले, असे चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात उभे राहिले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

उपमुख्यमंत्रीपदाचा अजित पवार यांनी राजिनामा दिला आहे. अवघ्या 78 तासांत पवार पायउतार झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार फोडणार आणि त्या बळावर भाजप सरकार स्थापन करणार, असे राज्यात वातावरण होते. याच आशेवर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.

अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप

प्रत्यक्षात अजित पवार यांनी अचानक उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून त्यांच्यावर पवार कुटुंबांचा भावनिक दबाव वाढायला लागला होता. राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते अजित पवारांना भावनिक अपील करतच होते; मात्र त्याहून अधिक दबाव कुटुंबाच्या भावनिक आवाहनांचा झाला असावा, असे आताच्या घडामोडींवरून दिसते.

महाराष्ट्राच्या राजकारणात असलेली अनेक पॉवरफुल्ल कुटुंबे फुटली आहेत. मात्र, पवार कुटुंब 2019 च्या नोव्हेंबरपर्यंत फुटलेले नव्हते. या कुटुंबात फुट पडून अजित पवार स्वतंत्र झाले होते. ज्येष्ठ नेते आणि कुटुंबप्रमुख शरद पवार, त्यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे आणि नातू, आमदार रोहित पवार एकीकडे व अजित पवार दुसरीकडे असे चित्र निर्माण झाले होते.

कुटुंबातील 'या' व्यक्तीमुळे वळले अजित पवारांचे मन अन् दिला राजीनामा

अजित पवार यांनी राजिनामा दिल्यापासून सुळे यांनी सुरुवातीला आपल्या भावाला परतीसाठी आवाहन केले. अजित पवार परत येत नसल्याचे पाहून त्यांनी आपल्या कुटुंबात फुट पडल्याची भावना व्यक्त केली.

शरद पवार यांच्या निकटवर्तीय नेत्यांनी सातत्याने अजित पवार यांना परतीचे आवाहन केले. याशिवाय, पवार कुटुंबाशी संबंधित अनेक नातेवाईकांनी, हितचिंतकांनी अजित पवार यांना भावनिक साद घातली.

अजित पवार भावनाप्रधान व्यक्ती आहेत आणि त्यामुळेच त्यांनी असा निर्णय घेतला आहे, यावर पवार कुटुंबातील निकटवर्तीयांचे एकमत होते. ते परत येतील, याबद्दलही बोलले जात होते.

टीव्ही वाहिन्यांवरील वृत्तानुसार, खासदार सुळे यांचे पती सदानंद सुळे यांनी आज अजित पवार यांची मनधरणी केली. त्या आधी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनीही अजित यांना परतीचे आवाहन केले. भावनिक आवाहनांचा परिणाम म्हणून अजित पवार यांनी राजिनामा दिल्याचे चित्र यातून उभे राहिले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar power plan success in Maharashtra NCP Shivsena and Congress form government in Maharashtra