सरकार बनविण्याची जबाबदारी भाजप-शिवसेनेची; पण...- शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 November 2019

सरकार बनविण्याची जबाबदारी ही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची आहे. त्यांच्याकडे  बहुमत आहे. आम्हाला जनतेने विरोधात बसण्याचा कौल दिला असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

नवी दिल्ली : महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा तिढा निर्माण झाल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांनी सरकार बनविण्याची जबाबदारी ही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची आहे. त्यांच्याकडे  बहुमत आहे. आम्हाला जनतेने विरोधात बसण्याचा कौल दिला असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. परंतु, काही अपक्ष आमदार आणि नेते हे आमच्याही संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.

सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन भेटीबाबतची माहिती पत्रकारांना दिली. राज्यातील राजकीय परिस्थितीविषयी सोनिया गांधी यांच्याशी चर्चा झाल्याची शरद पवार यांनी माहिती दिली. पवार म्हणाले की, मी सोनिया गांधी यांना भेटून आलो, परंतु सांगण्यासारखे असे काही भेटीत बोलणे झाले नाही. सोनिया गांधी यांची पुन्हा एकदा भेट घेणार असल्याचेही पवार यांनी सांगितले. 

शिवसेनेकडून कुठल्याही प्रकारचा आम्हाला प्रस्ताव आला नसल्याचेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले आणि प्रस्ताव आल्याशिवाय पुढे जाऊ शकत नसल्याचेही पवार यांनी सांगितले. तसेच, शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत आमच्यात कुठलाही निर्णय झाला नसल्याचे सांगत आपण राज्यात परतणार नाही असे सांगत मुख्यमंत्रीपदाच्या चाललेल्या चर्चांना पवार यांनी विराम दिला. यावेळी पवार यांच्यासोबत राष्ट्रावादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार हे उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar press Conference after he meets Sonia Gandhi