साखरसम्राटांनीच साखरेचे भाव पाडले - सदाभाऊ खोत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

शिर्डी - 'काही साखर कारखानदार, व्यापारी व दलालांनी संगनमत करून बाजारात मोठ्या प्रमाणात साखर आणून भाव पाडले. शेतकऱ्यांना किमान किफायतशीर मूल्य (एफआरपी) देता येऊ नये, व्यापाऱ्यांना स्वस्त दरातील साखरेची साठेबाजी करता यावी, हंगाम संपल्यानंतर व्यापाऱ्यांना व ठरावीक कारखानदारांना चढ्या भावाने साखर विकता यावी, यासाठी केलेले हे षडयंत्र आहे. त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करू,'' असा इशारा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज दिला.

मंत्री खोत यांनी आज साईसमाधीचे दर्शन घेतले. साईबाबा संस्थानाचे उपकार्यकारी अधिकारी संदीप आहेर यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर सरकारी विश्रामगृहावर ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी डॉ. राजेंद्र पिपाडा, दीपक पटारे, शिवनाथ जाधव, विष्णुपंत खंडागळे आदी उपस्थित होते.

खोत म्हणाले, 'साखरेचे भाव लवकरच वधारतील. कारखान्यांनी साखर विकण्याची घाई करू नये. साखरेवर शंभर टक्के आयातशुल्क लावावे. सध्याचा 20 टक्के निर्यातकर माफ करावा. अनुदान देऊन वीस लाख टन साखर सक्तीने निर्यात करावी. 30 ते 40 लाख टन साखरेचा बफर स्टॉक करावा, अशा मागण्या राज्य सरकारने केंद्राकडे केल्या आहेत. यंदा गरजेइतकेच उत्पादन होणार असल्याने साखरेचे भाव पडण्याचे काहीच कारण नाही. केंद्र व राज्य सरकारने आजवर साखर उद्योगाला मोठी मदत केली. "एफआरपी'साठी मागील वर्षी पॅकेज दिले. ऊसखरेदी कर माफ केला.''

'जलयुक्त शिवार योजनेमुळे बागायती क्षेत्र वाढले. यापूर्वी मोठ्या सिंचन योजनांच्या माध्यमातून ठेकेदार पोसण्याचे काम झाले. आर्थिक घोटाळे झाले. शेतकरी पाण्यापासून वंचित राहिला. कांदाचाळीसाठी अनुदान दिले जाणार आहे,'' असेही खोत म्हणाले.

मित्रपक्षांनी कॉंग्रेसविरुद्ध एकत्र लढावे
मंत्री खोत म्हणाले, 'श्रीरामपूर बाजार समितीत शेतकऱ्यांचे अनुदान हडप केल्याच्या तक्रारीची चौकशी सुरू आहे. चौकशीनंतर संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल.'' आगामी निवडणूक भाजप, शिवसेना व मित्रपक्षांनी एकत्र येऊन दोन्ही कॉंग्रेसविरोधात लढवावी, असे आपले व्यक्तिगत मत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: shirdi news maharashtra news sadabhau khot sugar rate