शिवसेना - भाजप पुन्हा भिडले 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

एमएमआरडीएने 18 फेब्रुवारीसाठी भाजपला मैदान दिले आहे. त्यासाठी आयुक्तांना पाठवलेल्या पत्राची सबब पुढे केली जात आहे. मात्र आयुक्त मैदान भाड्याने देण्याचे काम करतात का, असा प्रश्‍नही परब यांनी उपस्थित केला आहे. 
 

मुंबई - महापालिका निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर पातळी सोडून आरोप करणारे शिवसेना - भाजप मैदानावरून एकमेकांसमोर भिडले आहेत. शिवसेनेच्या प्रचाराचा समारोप वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानात होणार होता; मात्र प्रचारासाठी हेच मैदान मिळावे, यासाठी भाजपने अगोदर अर्ज केला असल्याचे कारण देत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने शिवसेनेला मैदान देण्यास नकार दिला. त्यामुळे शिवसेनेत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेनेने या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

महापालिका निवडणुकीच्या मैदानात एकमेकांवर आरोप करत शिवसेना- भाजपने प्रचाराची पातळी खाली आणली आहे. भ्रष्टाचारी, बिल्डरांचे दलाल असे आरोप दोन्हीकडून होत आहेत. त्यातच आता प्रचाराच्या समारोपाच्या सभेच्या निमित्ताने दोन्ही पक्ष एकमेकांना भिडले आहेत. शिवसेनेच्या प्रचाराची शेवटची सभा बीकेसी मैदानात 18 फेब्रुवारीला होती. या सभेसाठी शिवसेनेने 12 जानेवारीला एमएमआरडीएला पत्र दिले होते; मात्र आता प्राधिकरणाकडून शिवसेनेला मैदान देण्यास नकार दिला आहे. भाजपकडून 12 जानेवारीपूर्वी प्राधिकरणाच्या आयुक्तांना मैदानासाठी पत्र दिले असल्याने शिवसेनेला मैदान देता येत नसल्याचे सांगितले. एमएमआरडीएवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दबाव आणत असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार ऍड. अनिल परब यांनी केला आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असून शिवसेनेची सभा बीकेसीच्या मैदानातच होईल, असेही ऍड. परब यांनी सांगितले. 

एमएमआरडीएने 18 फेब्रुवारीसाठी भाजपला मैदान दिले आहे. त्यासाठी आयुक्तांना पाठवलेल्या पत्राची सबब पुढे केली जात आहे. मात्र आयुक्त मैदान भाड्याने देण्याचे काम करतात का, असा प्रश्‍नही परब यांनी उपस्थित केला आहे. 

Web Title: Shiv Sena - BJP contravercy again