Vidhan Sabha 2019 : कोल्हापुरात शिवसेनेने उधळले चंद्रकांत पाटील यांचे मनसुबे

टीम ई-सकाळ
रविवार, 29 सप्टेंबर 2019

कोल्हापुरातील आठ उमेदवारांची घोषणा करून, युतीच्या जागा वाटपात कोल्हापुरातील जागांची कोणतिही चर्चा होणार नसल्याचे शिवसेनेने  स्पष्ट केले आहे. शिवसेनेच्या या घोषणेमुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पंचाईत झाली आहे.

मुंबई : कोल्हापुरातील आठ उमेदवारांची घोषणा करून, युतीच्या जागा वाटपात कोल्हापुरातील जागांची कोणतिही चर्चा होणार नसल्याचे शिवसेनेने  स्पष्ट केले आहे. शिवसेनेच्या या घोषणेमुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पंचाईत झाली आहे. चंद्रकांत पाटील यांनी प्रमुख्याने जिल्ह्यातील दोन जागा भाजपकडे घेण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले होते. पण, शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्याने चंद्रकांत पाटील यांचे मनसुबे उधळून लावले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्षपद असूनही चंद्रकांत पाटील यांना दोन जागा आपल्याकडे खेचण्यात अपयश आले आहे. 

चंद्रकांत पाटील क्षीरसागरांचा प्रचार करणार?

मावळत्या सभागृहात कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे सहा, भाजपचे दोन आणि राष्ट्रवादीचे दोन आमदार होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी स्वतंत्र लढले होते. त्यामुळं यंदाच्या जागा वाटपात कोणाच्या वाट्याला कोणती जागा येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. त्यात विशेषतः कोल्हापूर उत्तरच्या जागेसाठी चंद्रकांत पाटील जास्त आग्रही होते. या जागेवर चंद्रकांत पाटील स्वतः रिंगणात उतरणार, अशी ही शक्यता वर्तवली जात होती.

Vidhan Sabha 2019 : भाजपचा पुन्हा विशेष कार्यक्रम; काँग्रेसचे 6 आमदार गळाला?

तसेच माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या पत्नी मधुरिमाराजे छत्रपती यांचे नावही मधल्या काळात चर्चेत आले. पण, मंत्रिमंडळातील बड्या नेत्याचा इतका दबाव असूनही, राजेश क्षीरसागर यांनी ही जागा हातची जाऊ दिली नाही. मुळात कोल्हापुरात शिवसेना आमदाराने सलग तीन वेळा कधीच विधानसभेची जागा जिंकलेली नाही.

यंदा क्षीरसागर यांचा त्यासाठी प्रयत्न असणार आहे. क्षीरसागर यांनी जागा आपल्याकडे राखून चंद्रकांत पाटील यांना शह दिल्याची सध्या कोल्हापुरात चर्चा आहे. चंद्रकांत पाटील यांना माझा प्रचार करावा लागले, अशा आशयाचे वक्तव्य क्षीरसागर यांनी केले होते. आता युती झालीच तर, खरंच चंद्रकांत पाटील यांना क्षीरसागर यांचा प्रचार करावा लागणार आहे.  

कागलमध्ये काय होणार?

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी शाहू कारखान्याचे अध्यक्ष, भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांच्यासाठी कागलच्या जागेचा आग्रह धरला होता. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमांमध्ये समरजितसिंह घाटगे यांचा उल्लेख कागलचे भावी आमदार असा करण्यात आला होता. पण, शिवसेनेचे कागल तालुक्यातील नेते आणि माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी समरजित यांच्यासाठी ही जागा सोडण्यास नकार दिला.

Vidhan Sabha 2019 : युतीचे घोडे अडले आता या दोन जागांवर

आता शिवसेनेने संजयबाबा घाटगे यांना उमेदवारीसाठी एबी फॉर्म दिल्याने कागलची जागा शिवसेनेकडेच राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. युती झाली तर, संजयबाबा घाटगेच कागलमध्ये युतीचे उमेदवार असतील. त्या परिस्थितीत समरजित घाटगे यांच्याकडे बंडखोरी करण्याचाच पर्याय राहतो. युती तुटली तर मात्र, भाजपकडून समरजित घाटगे रिंगणार उतरणार हे निश्चित आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena Destroyed plans of Chandrakant Patil in Kolhapur