कर्जमाफीच्या मागणीसाठी शिवसेनेचे मंत्री वर्षावर 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

मुंबई - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, या मागणीसाठी शिवसेनेच्या मंत्र्यांनी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भाजप सरकार सध्या "नोटीस'वर असल्याचे शिवसेनेने दोन दिवसांपूर्वी स्पष्ट केले आहे. लोकाभिमुख योजनांसाठी सरकारवर दबाव वाढवण्याचा मार्ग शिवसेनेने पत्करला असून, आजची भेट हा त्याचा भाग मानले जाते. 

उत्तर प्रदेशातील जाहीरनाम्यात भाजपने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्‍वासन दिले आहे, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही असे आश्‍वासन देण्यात यावे, ही मागणी करण्यात आली आहे. रात्री उशिरा यासंदर्भात उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री रामदास कदम, परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपला आमचा तीव्र विरोध आहे, हे दाखवण्यासाठी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुंबईतील शेवटच्या प्रचारसभेत राजीनामा देण्याची तयारी केली आहे. सत्तेत राहून भाजपला विरोध करणे मतदारांना पटणारे नसल्याने हे पाऊल उचलण्याचे ठरवण्यात आले आहे. सरकारच्या धोरणांना आमचा विरोध आहे, हे दाखवण्यासाठी शिवसेना टप्प्याटप्प्याने पावले उचलण्याच्या तयारीत आहे. मंत्री सत्तेची फळे चाखत असताना महापालिकेत जनता वेगळे मतदान कसे करेल, हा प्रश्‍न कार्यकर्त्यांपाठोपाठ मतदारही विचारणार, हे उघड असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हाती शिवसेनेचे मंत्री 18 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या प्रचारसभेत राजीनामे सुपूर्द करण्याची शक्‍यता वर्तवण्यात येते. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठी आघाडी मिळाली, तसेच उत्तर प्रदेश निवडणुकीचे निकाल भाजपच्या विरोधात असले, तर शिवसेना पाठिंबा काढण्याचा निर्णय घेऊ शकेल, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, भाजपने मात्र सरकारला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Web Title: Shiv Sena minister of the varsha for the waiver of the claim