मल्ल्यांच्या अटकेप्रमाणे सुटकेचेही श्रेय घ्या- सेनेचा टोला

टीम ई सकाळ
गुरुवार, 20 एप्रिल 2017

दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिए!
मल्ल्या जणू बीअरचा ग्लास ओठाला लावत लंडनच्या पोलिस ठाण्यात गेले. तिथे सगळ्यांनी मिळून ‘चिअर्स’ केले, पण बीअरचा उत्साही फेस मात्र इकडच्यांच्या तोंडाला आला. दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिए! 

मुंबई : विजय मल्ल्यांची ब्रिटनमधील अटक व सुटका हा एक सोहळाच ठरला असून, त्या सोहळ्यातच देश रमला आहे. मल्ल्यांच्या औटघटकेच्या अटकेचे श्रेय जे घेत आहेत त्यांनी ‘सुटके’चे श्रेयसुद्धा घ्यावे, असा चिमटा शिवसेनेने सत्ताधारी भाजपला काढला आहे. 

मद्यसम्राट विजय मल्ल्या यांना लंडनमध्ये स्कॉटलंड यार्डने अटक केल्याची बातमी येताच भाजप नेत्यांनी त्या कारवाईचे श्रेय घेत प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मात्र, काही वेळातच मल्ल्या यांना जामीन देऊन सोडण्यात आले. त्या संदर्भाने शिवसेनेने सामनामधून भाजप नेत्यांची खिल्ली उडवली आहे. 

सामनामध्ये म्हटले आहे की, "विजय मल्ल्या यांना लंडन येथे हातकडय़ा घातल्या असून पुढील चोवीस तासांत तोंडावर बुरखा घालून त्यांना फरफटत आणले जाईल असे यशस्वी वातावरण ज्यांनी निर्माण केले ते तोंडावर आपटले आहेत. प्रत्यक्षात श्रीमान मल्ल्या हे झटपट जामीन मिळवून पुन्हा लंडनमध्ये हिंडूफिरू लागले आहेत. देशातील बँकांना आठ-नऊ हजार कोटींना चुना लावून विजय मल्ल्या पळून गेले. बँका बुडाल्या आणि मल्ल्या उडाले."

मल्ल्या यांच्या फरार होण्याचा संदर्भ शिवसेनेने खासदार रवींद्र गायकवाड यांच्या विमान प्रवास बंदी प्रकरणाशी जोडला असून, त्यावरून भाजप आणि एअर इंडियालाही टोला लगावला आहे. "हिंदुस्थानी विमान कंपन्यांचा पाहुणचार घेतच ते लंडन येथे उतरले व तेव्हादेखील मल्ल्या यांच्या फसवणुकीचे प्रताप जगजाहीर झालेच होते. मग या ‘देशभक्त’ विमान कंपन्यांनी मल्ल्या यांना विमानात चढण्यापासून का रोखले नाही किंवा सरकारी तपास यंत्रणांना कळवून ‘राष्ट्रीय’ इमानदारीचे कर्तव्य का पार पाडले नाही? शिवसेनेचे खासदार रवी गायकवाड प्रकरणात विमान कंपन्या ‘बंदी’ हुकूम बजावतात व देश बुडवणाऱ्या मल्ल्यांना पळून जाण्यास मदत करतात. जणू काही मल्ल्यांना पळता यावे यात सरकार आणि विमान कंपन्यांची भागीदारीच होती," असे सेनेने म्हटले आहे. 
 

Web Title: shiv sena pinches bjp over vijay mallya case