शिवसेनेला सत्तेतून बाहेर पडण्यासाठी 'परफेक्ट टायमिंग"

Shivsena
Shivsena

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजप संघर्ष टोकाला गेला आहे. कारण आज सायंकाळी ५ वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते भाजपसोबतची युती तोडण्याची आणि सरकारमधून बाहेर पडण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली तर राज्य सरकार अस्थिर होण्याची शक्यता आहे. पालघर पोटनिवडणुकीत भाजपच्या राजेंद्र गावित यांनी शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांचा पराभव केला. मात्र या निवडणुकीत शिवसेनेना आणि भाजपने या सत्तेतील मित्रपक्षांनी एकमेंकावर तुफान टीका केली होती. त्याचाच भाग म्हणून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ऑडिओ क्लिप जारी केली होती. त्यामध्ये मुख्यमंत्री पालघर निवडणूक जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांना साम-दाम-दंड-भेद वापरण्याचे आदेश देत होते. त्यावरुनही शिवसेना-भाजपमधील तणाव वाढला आहे. शिवाय गेल्या चार वर्षातील शिवसेना- भाजपचे संबंध पाहता, उद्धव ठाकरे आज काही निर्णय घेतात का हे पाहणं औत्सुक्याचं आहे.  

भाजपा-शिवसेनेसाठी अत्यंत प्रतिष्ठेची ठरलेल्या पालघर पोटनिवडणुकीत अखेर भाजपाने बाजी मारली. गावित यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार आणि भाजपाचे दिवंगत खासदार चिंतामणी वनगा यांचा मुलगा श्रीनिवास यांचा २९,५७२ मतांनी पराभव केला. श्रीनिवास वनगा यांना  उमेदवारी दिल्यामुळे भाजपा आणि शिवसेनेतील संबंध ताणले गेले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ऑडिओ क्लिप प्रसारित करून शिवसेनेने प्रचारात रंगत आणली होती. पण याचा शिवसेनेला फायदा झाला नाही. ऐनवेळी काँग्रेसमधून भाजपात आलेले राजेंद्र गावित हे विजयी झाले. शिवसेनेचे श्रीनिवास वनगा हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले तर बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. भाजपाने प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही आणले होते. निवडणुकीपूर्वी तिन्ही पक्षांनी विजयाचा दावा केला होता. विशेष म्हणजे शिवसेना पहिल्यांदाच पालघर निवडणुकीत उतरली होती. त्यांनी भाजपला चांगली लढत दिली. 

जर शिवसेनेने भाजपचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर फडणवीस सरकार तरणार की कोसळणार? सेनेने सरकारचा टेकू काढला तर राज्याला मुदतपूर्व विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे लागणार की मुख्यमंत्री अल्पमतातील सरकार चालणार? शिवसेना सरकारमधून बाहेर पडल्यास कोणते राजकीय समीकरण जुळवून येणार?  राजकारणात काहीही शक्य आहे. म्हणून राजकारणाकडे विविध शक्यतांचा खेळ म्हणून पाहिले जाते. आजच्या घडीला भाजपकडे 123 आमदार आहेत. फडणवीस यांना  विधानसभेत साधे बहुमत सिद्ध करण्यासाठी 145 आमदारांची गरज आहे. सात अपक्ष आणि बहुजन विकास विकास पक्षाचे तीन आमदार सहजपणे सरकारकडे वळू शकतात. त्यामुळे भाजपला पाठिंबा देणाऱया आमदारांचा आकडा सहजपणे 133 पर्यंत पोहचू शकतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि भारिप-बहुजन यांचा प्रत्येकी एक आमदार आहे. कम्युनिस्ट पक्ष सोडला तरी मनसे आणि भारिपचा आमदार भाजपला साथ देऊ शकतो. त्यामुळे भाजपचा आकडा 135 आमदारांपर्यंत पोहचेल. विधानसभेत शेतकरी कामगार पक्षाचे तीन आमदार आहेत. हे आमदारही भाजपच्या मदतीला धावून जाऊ शकतात.

शिवसेनेसाठी परफेक्ट टायमिंग 
2014 ची विधानसभा निवडणूक एकमेकांच्या विरोधात लढवल्यानंतर शिवसेना जास्त काळ आपल्या सोबत राहणार नाही याची जाणीव भाजपला सुरुवातीपासून आहे. त्यामुळे भाजपने सरकार टिकवण्यासाठी सुरुवातीपासून आपले प्लॅन तयार करून ठेवले होते. शिवसेनेच्या सहभागामुळे गेली सव्वादोन वर्ष सरकार स्थिरावले आणि देवेंद्र फडणवीस यांना आपले प्लॅन अधिक पक्के करता आले. विधानसभेतील कोणत्याही आमदाराला मुदतपूर्व निवडणूक नको होती . ही परिस्थिती भाजपसाठी अनुकूल होती. तरीही सरकार अडचणीत आले तर भाजपच्या चाणक्यांनी आमदारांना फोडण्याची रणनिती आखलेली आहेच. भाजपच्या रडारवर काँग्रेस, राष्ट्रवादीप्रमाणे शिवसेनाही आहे. यापूर्वी नवव्या आणि अकराव्या विधानसभेत शिवसेनेचे आमदार फुटले आहेत. फडणवीस सरकार अडचणीत आले तर या फुटीच्या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते. पक्षांतर बंदी कायद्यामुळे पक्षात उभी फूट पडेल इतर आमदार फुटणार नसतील तर आमदारांना राजीनामा देऊन पुन्हा निवडून आणण्याची भाजपची योजना आहे. परंतु आजच्या घडीला सोपे नाही कारण आजच लागलेल्या विधानसभा निवडणुकांत 11 पैकी फक्त 1 जागा राखता आली. लोकसभेत 4 पैकी फक्त एका जागेवर विजय मिळवता आला.  त्यामुळे फुटणारे आमदार हा विचार नक्की करतील. वातावरण भाजपविरोधात असताना परत त्या पक्षाकडून निवडून येणे अवघड आहे हे काठावरचे आमदार ओळखून आहेत. त्यामुळे शिवसेनेला सरकारमधून बाहेर पडण्याची उत्तम संधी आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com