
भाजपसोबत युतीत शिवसेनेनं २५ वर्षे वाया घालवली - उद्धव ठाकरे
मुंबई : भाजपसोबत युती करुन शिवसेनेनं २५ वर्षे वाया घालवली, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. रविवारी शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त आयोजित शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. हा मेळावा व्हर्च्युअल स्वरुपात पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर चौफेर टीका केली. (Shiv Sena wasted 25 years in alliance with BJP says Uddhav Thackeray)
ठाकरे म्हणाले, "भाजपला पाठिंबा देणारे आम्ही त्याकाळी एकटे होतो. आमची युती २५ वर्षे चालली. यावेळी भाजपनं हिंदुत्वाचा वापर सत्ता मिळवण्यासाठी केला. आम्ही आता भाजपची साथ सोडली आहे पण हिंदुत्वाची नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे, आम्ही भाजपला आव्हान दिल्यानंतर त्यांनी आमच्याविरोधात कट-कारस्थानं रचण्यास सुरुवात केली आहे. एकूणच आम्ही युतीची २५ वर्षे वाया घालवली" भाजपची राजकीय वाढ होत असताना भाजपचं अनेक ठिकाणी डिपॉझिटही जप्त झालं होतं. त्यानंतर भाजपनं शिवसेनेसह अनेक प्रादेशिक पक्षांशी जुळवून घेतल्याची आठवण यावेळी उद्धव ठाकरे यांनी करुन दिली. शिवसेनेनं भाजपशी युती केली ती हिंदुत्वाला बळ मिळावं म्हणून पण शिवसेनेनं कधीही हिंदुत्वाचा वापर सत्ता मिळवण्यासाठी केला नाही, असा दावाही ठाकरे यांनी केला.
अमित शाहांचं आव्हानं शिवसेनेनं स्विकारलं!
यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "भाजप नेते अमित शहा यांनी स्वतंत्रपणे लढण्याचं दिलेलं आव्हानं शिवसेनेनं स्विकारलं आहे" मध्यंतरी पुणे दौऱ्यावर असताना भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शहा यांनी शिवसेनेला एकट्यानं लढण्याचं आव्हान दिलं होतं. त्यावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं.
काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीचं केलं समर्थन
2019 च्या निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना ठाकरे म्हणाले, "भाजपला त्यांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही मनापासून पाठिंबा दिला. आम्ही महाराष्ट्रात नेतृत्व करू तेव्हा ते राष्ट्रीय पातळीवर असतील, असा आमचा समज होता. पण आमचा विश्वासघात केला गेला आणि आमच्या घरात आम्हाला उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला गेला, त्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं"
Web Title: Shiv Sena Wasted 25 Years In Alliance With Bjp Says Uddhav Thackeray
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..