
शिवरायांच्या राजलिपीच्या संवर्धनासाठी धडपडणाऱ्या तरुणाचे नाव नवीन माळी असे आहे. त्यांनी Modifier.IN हे संकेतस्थळ विकसित केले असून, त्यावर www.enav.in हा उपक्रम सुरू केला.
नागपूर ः जलद लेखन होत असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी मोडी लिपीचा स्वराज्याची राजलिपी म्हणून वापर केला. महाराजांनी मोडीत लिहिलेली असंख्य कागदपत्रे आजही वाचकांच्या प्रतीक्षेत आहेत. आजच्या पिढीमध्ये मोडीबाबत उत्सुकता निर्माण व्हावी, या लिपीबद्दल तरुणाईच्या मनात आदरपूर्वक स्थान निर्माण व्हावे, यासाठी संकेतस्थळ तयार करून डिजिटल स्वरूपात मोडीची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य वेगाने सुरू आहे. यामुळे विस्मरणात गेलेल्या मोडीच्या प्रचार-प्रसारासोबतच, ती शिकण्याकडे नागरिकांचा कल नक्कीच वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शिवरायांच्या राजलिपीच्या संवर्धनासाठी धडपडणाऱ्या तरुणाचे नाव नवीन माळी असे आहे. त्यांनी Modifier.IN हे संकेतस्थळ विकसित केले असून, त्यावर www.enav.in हा उपक्रम सुरू केला. www.enav.in च्या माध्यमातून आपण कोणत्याही भाषेतील लिखाण मोडीमध्ये काही क्षणात डिजिटली ई-मेलवर मिळवू शकतो. मोडी लिपीचे प्रमुख वैशिष्ट म्हणजे यात अतिशय जलद लेखन होते. शिवाजी महाराजांनी केलेले ऐतिहासिक मोडीतील लेखन कागदपत्रांत बंद आहे.
भारतावर राज्य करणारे इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच लोक येथे राहून मोडी लिपी शिकायचे. त्याआधारे ते इतिहासाचा आढावा घ्यायचे. सर विल्यम्स कॅरे नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याने ‘अ डिक्शनरी ऑफ मरहट्टा लॅंग्वेज’ आणि ‘अ ग्रामर ऑफ मरहट्टा लॅंग्वेज’ हे दोन ग्रंथ १८१० व १८२५ मध्ये लिहिले. ज्यामध्ये मोडी हस्तलिखित व इंग्रजी टंकलिखित करून पुस्तके प्रकाशित केली होती. काही वृत्तपत्रे मोडीमध्ये जाहिराती द्यायचे. परंतु १९५० नंतर मोडीत निघालेली मोडी आज डिजिटल स्वरूपात उभारी घेत आहे.
उच्च न्यायालयाने खडसावल्यानंतर बीडीओंचे विस्तार अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश
युवा पिढीला सहज उपलब्ध व्हावी म्हणून मोडी लिपी डिजिटली उपलब्ध झाली आहे. देवनागरीचा वापर करून केलेले टंकन मोडी देवनागरी लिपीत रूपांतरित करता येते. मोडी लिपीच्या डिजिटल वापराने मोडीला एक डिजिटल स्थान मिळेल. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही भाषा पोहोचेल. मोडीची गोडी वाढल्यानंतर तिचे अभ्यासक आणि वाचक तयार होतील. मोडीचे सहस्रावधी दस्तऐवज वाचकांअभावी पडून आहेत. हा ठेवा नेमका कसला आहे, हे जाणून घेण्यासाठी तरी मोडी शिकणे गरजेचे असल्याची तळमळ नवीन माळी यांनी व्यक्त केली.
मोडीचे संवर्धन व्हावे म्हणून Modifier.IN या वेबसाईटने www.enav.in उपक्रम सुरू केला. www.enav.in या माध्यमातून आपण कोणतेही नाव छत्रपती शिवाजी महाराजांची राजलिपी मोडीत काही क्षणात डिजिटली इमेलवर मिळवू शकता. www.enav.in या वेबसाईटला भेट दिल्यावर आपल्याला जे नाव पाहिजे ते देवनागरी वा इंग्रजी भाषेत लिहावे. आपला संपर्क क्रमांक व इमेल आयडी नोंद करून Submit करावा. दिलेल्या इमेलवर सदर नाव मोडी लिपीत पाठविण्यात येईल.
मोडी लिपी शिकण्याची सुरुवात
आमची वेबसाईट म्हणजे मोडी लिपी शिकण्याची सुरुवात आहे. सुरुवातीला एखाद्या भाषेबद्दल नागरिकांच्या मनात कुतूहल निर्माण होणे गरजेचे आहे. यामुळे त्या भाषेची गोडी लागेल. आमच्या वेबसाईटवर अनेक इतिहास संशोधक, अभ्यासक भेट देतात. ज्यांनी मोडी शिकवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे मोडी संवर्धनाची ही चळवळ अविरत सुरू राहणार आहे.
नवीनकुमार माळी, संचालक मॉडीफायर, कोल्हापूर