रायगडाचा अदृश्‍य इतिहास पुन्हा उजेडात!

रायगडाचा अदृश्‍य इतिहास पुन्हा उजेडात!

कोल्हापूर - रायगडावरील वास्तू जरूर शिवकालीन इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. पण काळाच्या ओघात काही वास्तू आणि वस्तू मातीच्या ढिगाऱ्याखाली दडल्या आहेत. त्यापैकी काही वास्तू खूप प्रयत्नांती आता पुन्हा प्रकाशात येत आहेत. यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात या शिवकालीन वास्तूंचे दर्शन शिवभक्तांना होणार आहे. किंबहुना, यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे ते एक वेगळे वैशिष्ट्यच ठरणार आहे.

रायगड विकास प्राधिकरणाच्या वतीने रायगडाचे संवर्धन व जतन करण्याचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत गडावरील काही ठिकाणी मातीच्या ढिगाऱ्याखाली दडलेले वास्तव शास्त्रोक्त तंत्राने जगासमोर आणले जात आहे. रायगडावर असे दबलेल्या अवस्थेत ३०० वाडे, घरे असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यापैकी दोन वाड्यांच्या अवशेषांना पुन्हा उजेडात आणले असता त्यामध्ये भांडी, दागिने, घराची कौले, नित्य वापरातील काही वस्तू, हत्यारे मिळाली आहेत. साधारण छोट्या-मोठ्या स्वरूपाच्या या ८५० वस्तू आहेत. तसेच, वाड्याच्या रचनेतून तत्कालीन निवासव्यवस्था, राहणीमान यांचाही अभ्यास करता येणार आहे. ज्या वेळी आणखी वाड्यांचे अवशेष उजेडात येतील तेव्हा रायगडाचे आणखी एक वेगळेपण जगासमोर येणार आहे.

***************************************************

८५०  - गडावर उत्खननानंतर सापडलेल्या विविध प्रकारच्या वस्तू  भांडी, दागिने, घराची कौले, नित्य वापरातील वस्तू, हत्यारे 
२ खुले झालेले वाडे

***************************************************

रायगड विकास प्राधिकरणाच्या वतीने हे काम खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, यातील तांत्रिक स्वरूपाची सर्व जबाबदारी कॉन्झर्व्हेशन आर्किटेक्‍ट वरुण भामरे यांच्याकडे आहे. रायगडाच्या जतन व संवर्धनाचे काम करताना जे काही वेगळे मातीत दडलेले दिसेल ते बाजूला काढले जात आहे. मातीचा छोटा-छोटा भागही अगदी चाळून घेतला जात आहे आणि त्यातून जे काही दृश्‍य स्वरूपात पुढे येत आहे; त्या वस्तू म्हणजे रायगडाच्या इतिहासाच्या खणखणीत साक्षीदार आहेत.

या कामात महत्त्वाचा वाटा असलेले वरुण भामरे यांनी ‘सकाळ’शी बोलताना रायगडाची सद्यःस्थिती स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘‘राजधानीसाठी शिवरायांनी रायगडाची निवड का केली, हे रायगडाच्या भव्यतेतून आणि भक्कमपणातून कळते. रायगडाची एकेक पायरी जशी आपण वर चढत जाऊ तसतसे रायगडाचे वेगळे रूप आपल्याला जाणवू लागते. राजधानीचा हा गड असल्याने राजवाडा, सदर, मंदिर, तलाव, पाणीसाठे, निवासस्थाने, घोड्याच्या पागा हे सारे ओघाने आलेच. पण, इतक्‍या उंच गडावर तत्कालीन परिस्थितीत सारी उभारणी करताना शिवाजी महाराज व त्यांच्या सहकाऱ्यांनी जी काही दूरदृष्टी दाखवली, ती असामान्य आहे. 

काळाच्या ओघात ऊन, वारा, पावसाच्या माऱ्यात गडावर अनेक स्थित्यंतरे झाली. काही वास्तू बऱ्यापैकी सुस्थितीत राहिल्या, काही भुईसपाट झाल्या. पण, त्या वास्तू भुईसपाट होताना इतिहास आपल्या उदरात जपत राहिल्या. त्यामुळेच आज काही वास्तूंचे जतन करण्याच्या दृष्टीने आजूबाजूची माती काढताना मूळ वास्तूची रचना उघड झाली. त्या त्या निवासी वास्तूतील भांडी, कौले, दागिने, नित्य वापरातील वस्तू, जाती, अगदी खिळे-मोळे अशा जवळपास ८५० वस्तू मिळाल्या आहेत. अद्यापही ३०० वास्तू मातीखाली दडलेल्या आहेत. यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने लाखो शिवभक्त गडावर येणार आहेत. त्यांना या वास्तूंचे अवशेष आणि वस्तू पाहता येणार आहेत.’’ 

आकर्षणाचे केंद्र ठरणार 
गडावरील नाणे दरवाजाचे बहुतेक दगड आजूबाजूला भग्नावस्थेत पडलेले सापडले आहेत. त्यामुळे या दरवाजाची त्याच शैलीत पुन्हा बांधणी केली जाणार आहे. याशिवाय, रायगडाचा महादरवाजा व तटबंदीची ८५० मीटर लांब अंतराची स्वच्छता केली आहे. तटबंदीवरील झाडाझुडपांवर रसायनांची फवारणी करून ती नष्ट केली आहेत. पायथ्यावर दोन्ही बाजूंनी मंद प्रकाशझोत टाकले आहेत. त्यामुळे रायगड साऱ्या देशवासीयांचे आकर्षणाचे केंद्र बनणार, हे नक्की.

या सर्व कामाला खासदार संभाजीराजे छत्रपती, महाराष्ट्र शासन, केंद्र पुरातत्त्व विभाग, राज्य पुरातत्त्व विभाग यांचे पूर्ण सहकार्य आहे. हे काम म्हणजे आव्हान आहे. पण, या गडामध्ये शिवरायांच्या स्मृतीची ऊर्जा आजही इतकी आहे, की ते काम करताना थकण्याचा क्षण वाट्याला येतच नाही. साऱ्या महाराष्ट्रवासीयांनी रायगडाचे हे अंतरंग जरूर पाहावे.
- वरुण भामरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com