शिवसेनेला स्वबळावर लोकसभेच्या 16 जागा? 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 8 मे 2018

शिवसेनेने स्वबळ आजमवल्यास काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला 22-23 जागांची लॉटरी लागू शकेल; मात्र भाजपला केवळ 10 जागांवर समाधान मानावे लागेल, असे अनुमान या सर्वेक्षणाच्या अहवालात वर्तवण्यात आले आहे.

मुंबई - शिवसेनेने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात स्वबळावर लोकसभा निवडणूक लढल्यास पक्षाला राज्यातील 48 मतदारसंघांपैकी 15-16 जागांवर विजय मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शिवसेनेने स्वबळ आजमवल्यास काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला 22-23 जागांची लॉटरी लागू शकेल; मात्र भाजपला केवळ 10 जागांवर समाधान मानावे लागेल, असे अनुमान या सर्वेक्षणाच्या अहवालात वर्तवण्यात आले आहे. या अहवालामुळेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. 

हे सर्वेक्षण करताना 2014 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांत सर्व पक्षांना मिळालेल्या मतांचा आधार घेण्यात आला. त्याशिवाय प्रत्येक मतदारसंघातील सद्यस्थितीचा अंदाज घेण्यासाठी शिवसेनेच्या एका जिल्ह्यातील नेत्याने दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन चाचपणी केली. त्यानंतर तीन महिन्यांपूर्वी हा अहवाल ठाकरे यांच्याकडे सादर करण्यात आला. 

हा अहवाल मिळाल्यानंतर शिवसेनेने लोकसभा मतदारसंघांतील उमेदवार निश्‍चित करण्यास सुरवात केली आहे. सध्याचा ठाकरे यांचा राज्यव्यापी दौराही त्याचाच भाग असल्याचे बोलले जाते. 

2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांत भाजपशी युती असताना शिवसेनेला 18 जागा मिळाल्या होत्या. आता स्वबळावर लढल्यास 15 ते 16 जागा मिळतील असा अंदाज आहे. गेल्या वेळेच्या तुलनेत दोन तीन जागांचे नुकसान होणार असले, तरी 2009 च्या तुलनेत शिवसेना प्लसमध्ये असेल, असे या अहवालात नमूद आहे. 

त्यामुळेच स्वबळाचा नारा... 
केंद्रात तसेच राज्यात सत्तेत असतानाही शिवसेनेने विरोधकांची जागा व्यापली आहे. दुसरीकडे सद्यस्थितीत नागरिकांमध्ये भाजपबद्दल नाराजीचे वातावरण आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीवरील मतदारांचा रोष अद्याप कमी झाला नसल्याने आपल्याला फायदा होईल, असे शिवसेना नेत्यांना वाटत आहे. त्यामुळेच शिवसेनेने स्वबळावर जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. 

सध्याचे लोकसभेतील संख्याबळ - 
शिवसेना - 18, भाजप - 23, काँग्रेस - 2, राष्ट्रवादी काँग्रेस - 4, स्वाभिमानी शेतकरी संघटना - 1 

निवडणुका झाल्यास मिळू शकणाऱ्या पक्षनिहाय जागा 

  • शिवसेना - उत्तर-पश्‍चिम मुंबई, उत्तर-पूर्व मुंबई, दक्षिण मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, रायगड, मावळ, सिंधुदुर्ग- रत्नागिरी, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, शिरूर 
  • भाजप - रावेर, अकोला, नागपूर, पुणे, अहमदनगर, बीड, अमरावती, वर्धा, रामटेक 
  • काँग्रेस - नंदूरबार, धुळे, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, शिर्डी, लातूर, सोलापूर, सांगली आणि मुंबईतील एखादी जागा 
  • राष्ट्रवादी काँग्रेस - बुलडाणा, गडचिरोली, परभणी, जालना, दिंडोरी, बारामती, उस्मानाबाद, माढा, सातारा, भंडारा-गोदिंया आणि कोल्हापूर 
  • स्वाभिमानी शेतकरी संघटना - हातकणंगले 
Web Title: Shivsena on 16 seats in Lok Sabha