
आदित्य ठाकरेंना दीपक केसरकरांच्या घरासमोरून जाण्यास मज्जाव
मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत मोठं खिंडार पडलं आहे, शिवसेनेतील 40 हून जास्त आमदारा शिंदे गटात सामिल झाल्याने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला, शिवसेनेत झालेली ही मोठी फूट भरुन काढण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे पक्ष बांधणीच्या कामाला लागले आहेत. शिवसेनीतील झालेल्या गळतीच्या पार्श्वभूमिवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यभर निष्ठा यात्रा सुरु केली यांच्या उद्या होणाऱ्या निष्ठा यात्रेला सावंतवाडीतील गवळी तिठ्यावरून निघणाऱ्या रॅलीला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे.
सिधुदुर्ग जिल्ह्यातील या यात्रेदरम्यान उद्या होणार्या सावंतवाडीतील रैलीपुर्वी पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ही मिरवणूक उद्या शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्या घरासमोरुन जाणार होती. या पार्श्वभूमिवर शिवसैनिकांना दीपक केसरकर यांच्या घरासमोरुन मिरवणूक नेण्यास पोलिसांकडून मज्जाव केला आहे. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे
निष्ठा यात्रेनिमित्ताने शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात असणार आहेत. या यात्रेदरम्यान आदित्य ठाकरे यांची सावंतवाडीतील गवळी तिठ्यावरून रॅली निघणार होती. परंतु, प्रशासनाने त्यांच्या या रॅलीला परवानगी नाकारली. गवळी तिठ्या जवळ बंडखोर आमदार दीपक केसरकर यांचं घर आहे. केसरकर यांच्या घरा समोरूनच आदित्य ठाकरे यांची रॅली जाणार होती. मात्र पोलिसांनी या रॅलीला परवानगी नाकारली आहे. यामुळे आता गवळी तिठ्या ऐवजी आता चिटणीस नाका ते गांधी चौक अशी रॅली होणार असून गांधी चौकात आदित्य ठाकरे कार्यकर्त्याशी संवाद साधणार आहेत.