शिवसेना-भाजप संघर्ष पारंपरिक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

१९९९ मध्ये भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा हट्ट
१९९९ मध्ये जेव्हा भाजप - शिवसेनेला बहुमत मिळाले नाही त्या वेळेस भाजपने बाळासाहेब ठाकरेंकडे मुख्यमंत्रिपद देण्याचा हट्ट केला. त्या वेळी गोपीनाथ मुंडे यांना मुख्यमंत्री करा, तरच समर्थन देऊ अशी भूमिका भाजपने घेत प्रसंगी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन सत्ता स्थापन करू, अशी धमकी दिली होती. भाजपच्या या धमकीमुळे शिवसेनेला आमदारांसह काही अपक्ष आमदारांची पळवापळवीही करावी लागली होती. मात्र भाजपने मुख्यमंत्रिपदाचा हट्ट कायम धरल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आणि विलासराव देशमुख हे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्वात मुख्यमंत्रिपदावर बसले.

मुंबई - राज्यात सध्या सत्ता संघर्ष जोरात पेटला आहे. मुख्यमंत्रिपदासह सत्तेतील समसमान वाटपावर शिवसेना अडून बसली आहे, तर भाजप मुख्यमंत्रिपद सोडायला तयार नाही. समान विचारधारा असणारे हे दोन मोठे पक्ष एकमेकांविरोधात उभे टाकल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. मात्र शिवसेना भाजपमधील हा सत्तासंघर्ष नवीन नसून, या सत्तासंघर्षाला जुने संदर्भ कारणीभूत असल्याचे राजकीय विश्‍लेषकांच म्हणणे आहे.

२०१४ मध्ये शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपावरून युती तुटली आणि शिवसेना-भाजपचा पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. सत्तास्थापनेच्या वेळेला शिवसेना विरोधी बाकावर बसली आणि भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांची साथ घेत बहुमत सिद्ध करत सत्ता मिळवली. शिवसेनेला सात कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्री पदांवर समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि सत्तेत सामावून घेतले. मात्र आता चित्र पालटले आहे. आता पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपचा सत्तासंघर्ष मुख्यमंत्रिपद आणि सत्तेतील समसमान वाटप यावरून सुरू झाला असला, तरी या वेळी शिवसेनेचे पारडे जड असल्याने त्यांनी भाजपची कोंडी केली आहे.

शिवसेना-भाजपमधला संघर्ष प्रत्येक सत्तावाटपाच्या वेळेस उभा राहतो. याचे मागचे जुने काही संदर्भ आहेत. १९९५ मध्ये जेव्हा पहिल्यांदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या झंझावातामुळे महाराष्ट्रामध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले, त्या वेळेलाही आपल्या पदरात अधिक खाती यावीत आणि महत्त्वाची खाती आपल्याकडे राहावीत म्हणून भाजपचे तत्कालीन दोन महत्त्वाचे नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे अडून बसले होते. शरद पवार यांना मध्यस्थी करायला लावून महत्त्वाची सगळी खाती महाजन यांनी भाजपकडे ठेवली. त्यात उपमुख्यमंत्री, गृहमंत्री होते, ऊर्जामंत्रीपदही भाजप खेचण्यात यशस्वी झाली होती. 

भाजपचे आणि प्रमोद महाजनांचे हट्ट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पुरवले होते. शिवाजी पार्कवर जवळपास एक महिन्याच्या कालावधीनंतर शपथविधीचा सोहळा पार पडला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena BJP disturbance traditional politics