मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे?; पालखीत कोण बसणार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 November 2019

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये ज्येष्ठ नेत्यांची संख्या मोठी आहे, त्यामुळे उद्धव यांनाच मुख्यमंत्री केले जावे, अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतल्याचे समजते. दरम्यान, राज्यपालांनी निमंत्रण दिल्यानंतर शिवसेनेतील घडामोडींना वेग आला असून, 'मातोश्री'वर रविवारी रात्री झालेल्या बैठकीस पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर आदी मंडळी उपस्थित होती.

मुंबई :  मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव आघाडीवर असून, राष्ट्रवादी काँग्रेसनेच उद्धव यांच्या नावाला पसंती दिली असल्याची चर्चा आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये ज्येष्ठ नेत्यांची संख्या मोठी आहे, त्यामुळे उद्धव यांनाच मुख्यमंत्री केले जावे, अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतल्याचे समजते. दरम्यान, राज्यपालांनी निमंत्रण दिल्यानंतर शिवसेनेतील घडामोडींना वेग आला असून, 'मातोश्री'वर रविवारी रात्री झालेल्या बैठकीस पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर आदी मंडळी उपस्थित होती, या बैठकीत नेमके काय ठरले, हे मात्र स्पष्ट झालेले नाही. 

भाजपची माघार; लक्ष शिवसेनेकडे

राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने असमर्थता दर्शविल्याने राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी आता शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. त्यांना आज (ता. ११) सोमवार सायंकाळी साडेसात वाजेपर्यंतचा वेळ राज्यपालांनी दिला असून, तोपर्यंत सत्ता स्थापन करू शकणार का, हे शिवसेनेला राज्यपालांना कळवावे लागणार आहे. सत्तेत मुख्यमंत्रिपदाचे मानाचे पान मिळावे, यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नाड्या आवळण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेसमोरची राजकीय आव्हाने वाढली आहेत.

शिवसेना 'एनडीए'तून बाहेर?; अरविंद सावंत यांचा राजीनामा

भाजपने शिवसेना सोबत नसेल, तर सत्तास्थापन करण्यास असमर्थता व्यक्त करीत धक्कातंत्रांचा वापर करीत शिवसेनेला सत्ता स्थापण्यासाठी ‘खो’ दिला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या १०५ जागा निवडून आल्याने शिवसेनेने ५६ जागांच्या बळावर भाजपकडे अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद मागितले. पण, त्यासाठी भाजप तयार तर झाला नाहीच; पण शिवसेनेची मनधरणी करण्याचा प्रयत्नही भाजपने केला नाही. भाजप सत्तास्थापनेसाठी दावा करेल आणि त्यानंतर त्यांच्याकडे शिवसेनेशिवाय पर्याय नसेल, असा शिवसेनेचा कयास होता. मात्र, तो पूर्णपणे फोल ठरला. दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करून भाजपवर दबाव वाढविण्याचाही प्रयत्न शिवसेनेकडून होत होता. मात्र, शिवसेनेची ही सगळीच गणिते फिस्कटल्याने शिवसेनेची आव्हाने वाढली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena chief Uddhav Thackeray may be next chief minister in Maharashtra