हिच ती वेळ! मी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की...

हिच ती वेळ! मी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की...

मुंबई : कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, याचा प्रचिती आज (गुरुवार) पुन्हा एकदा सुमारे 20 वर्षांनी शिवतीर्थावर पाहायला मिळाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की असे उच्चारताच महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळाला. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे महाविकास आघाडीचे सरकार आज राज्यात स्थापन झाले आहे.

राज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर मंगळवारी महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे निश्‍चित झाले. यानुसार महाविकास आघाडीचे नेते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री म्हणून शिवाजी पार्कवर सायंकाळी 6.40 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह शिवसेनेकडून गटनेते एकनाथ शिंदे, ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या कार्यक्रमामुळे आता नवे सरकार राज्यात स्थापन झाले आहे.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुरुजांचे तट असलेले भव्य स्टेज बनविला होता. अत्यंत भव्यदिव्य रुपात झालेल्या या सोहळ्याला सुमारे लाखभर नागरिकांचा उपस्थिती होती. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या शपथविधीला येऊ शकल्या नाहीत. पण, त्यांना सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत. या शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेंद्र बघेल, तमिळनाडूतील द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलीन, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. या सोहळ्याला राज्यभरातून सुमारे लाखभर नागरिक उपस्थित होते. याशिवाय राजकीय नेते, चित्रपटसृष्टीतील कलाकारही यावेळी उपस्थित होते. यामध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते राज्यातील शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते. महाशपथविधी सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी शिवाजी पार्कवर जनसागर उसळला होता. 

शपथविधी सोहळ्यासाठी शिवाजी पार्कवर विस्तीर्ण व्यासपीठ उभारण्यात आले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधिस्थळावर फुलांची सजावट केली आहे. शपथविधी सोहळ्यादरम्यान मराठी संस्कृतीची परंपरा सांभाळत विविध कला सादर करण्यात आल्या. लोककलाकार नंदेश उमप यांनी पोवाड्याचे गायन करत उपस्थितांमध्ये जोश निर्माण केला. ठाकरे घराण्यातील पहिलाच व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 

तब्बल वीस वर्षांनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाला आहे. यंदा पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील आदित्य ठाकरेंच्या रुपाने आमदार झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सभागृहात बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्यानंतर राष्ट्रावादीचे बंडखोर नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला. त्यामुळे बहुमतापर्यंत पोचू शकणार नसल्याची जाणीव होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राजीनामा दिला. त्यामुळे फडणवीस सरकारचा कारभार चार दिवसांत उरकला. त्यानंतर वेगवान घडामोडी घडल्या व महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com