राज्यात महायुतीचे सरकार येणार म्हणजे येणार : उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 September 2019

कष्टकऱ्यांचे सरकार आले पाहिजे. कामगारांशी प्रामाणिक राहणारे नेते हवेत. सुडाचे राजकारण कधी आम्ही केले नाही आणि करणारही नाही. पुढील सरकार युतीचेच असेल. नेतृत्व चुकले तर कामगार देशोधडीला लागतो.

मुंबई : येत्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार येणार म्हणजे येणार हे निश्चित आहे. कामगार नेते नरेंद्र पाटील यांना खासदार करण्याचे स्वप्न पूर्ण करणार, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबईत आज (बुधवार) झालेल्या माथाडी कामगार मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आले होते. या कार्यक्रमात युतीची घोषणा होण्यापूर्वी दोघे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. या ठिकाणी फडणवीस आणि ठाकरे यांनी महायुतीच्या नावाचा उल्लेख केला. त्यामुळे युती होणार हे निश्चित समजले जात आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, की कष्टकऱ्यांचे सरकार आले पाहिजे. कामगारांशी प्रामाणिक राहणारे नेते हवेत. सुडाचे राजकारण कधी आम्ही केले नाही आणि करणारही नाही. पुढील सरकार युतीचेच असेल. नेतृत्व चुकले तर कामगार देशोधडीला लागतो. माथाडींमध्ये संघर्षाचा आत्मविश्वास जागविला पाहिजे.

सरकार कामगारांच्या पाठिशी भक्कम : मुख्यमंत्री
नरेंद्र पाटील आणि शशिकांत शिंदे यांना सांगतो, की आमचे सरकार माथाडी कामगारांच्या पाठिशी कायम भक्कमपणे उभे राहील. ही पृथ्वी कामगारांच्या तळहातावर उभी आहे. माथाडी कायद्याला 50 वर्षै झाल्यानिमित्त मी सर्वांचे अभिनंदन करतो. माथाडी कामगारांच्या घरांसाठी सर्वांगीण प्रयत्न करण्यात येतील. पंतप्रधान आवास योजनेतून त्यांना मदत केली जाईल. सिडकोच्या माध्यमातून घरे देण्यात येतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena Chief Uddhav Thackeray talked about alliance with BJP