आमच्यामुळेच मोदींच्या तोंडून राममंदिराचा उच्चार: शिवसेना

Shivsena
Shivsena

मुंबई : राममंदिर बांधायचे वचन काँग्रेसचे नसून भाजपचे आहे. अयोध्येचा राजकीय आखाडा होऊ नये. 2019 पूर्वी रामाचा वनवास संपावा यासाठी आणि मंदिरनिर्मितीच्या वचनाचा ज्यांना विसर पडला आहे त्यांना त्याची आठवण करून देण्यासाठी आम्ही अयोध्येत गेलो. आमच्या अयोध्येतील ललकारीनंतर राजस्थानातील प्रचारसभेत तर पंतप्रधान मोदी यांनी राममंदिराचा उल्लेख केला. चला, इतक्या वर्षांनंतर मोदी यांच्या तोंडून राममंदिराचा उच्चार तरी झाला. आमची अयोध्या यात्रा सफल झाली. ते उठले, त्यांना जाग आली, असे शिवसेनेकडून म्हणण्यात आले आहे.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौरा केला होता. या दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदींनी राजस्थानमधील सभेत राम मंदिराचा उल्लेख करत काँग्रेसमुळेच राम मंदिर उभारले नसल्याचे म्हटले आहे. याच मुद्द्यावरून शिवसेनेने मोदींना लक्ष्य करत 'सामना'च्या अग्रलेखातून राम मंदिराची आमच्यामुळेच आठवण झाल्याचे म्हटले आहे.

शिवसेनेने म्हटले आहे, की अयोध्येत जे येतात त्यांचे मनोरथ पूर्ण होते, असे सांगतात. आम्ही अयोध्येत आलो ते वैयक्तिक आणि राजकीय मनोरथ घेऊन नाही, तर आपल्या अयोध्येतच वनवास भोगणाऱ्या श्रीरामाच्या हक्काच्या मंदिरासाठी. अयोध्यावासीयांनी आमचे प्रेमाने आगत स्वागत केले, ‘झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या, फुले उधळली. त्यामुळे आम्ही आनंदी झालो असलो तरी रामजन्मस्थानी वनवास भोगणाऱ्या रामप्रभूंची व्यथा घेऊन आम्ही महाराष्ट्रात परतलो आहोत. आमच्या अयोध्या दौऱ्याने एक काम मात्र नक्कीच झाले, राममंदिरप्रश्नी जे झोपले होते त्यांनी कूस बदलली नाही, पण डोळे मात्र उघडले आहेत. राममंदिराविषयी जुमलेबाजी आणि थापेबाजी चालणार नाही याची जाणीव सगळ्यांनाच झाली. पंतप्रधान मोदी यांनी राजस्थानातील एका प्रचार सभेत असे सांगितल्याचे कळते समजते की, अयोध्येत राममंदिर बांधायचे आहे, पण काँग्रेस पक्ष याप्रकरणी सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप करीत आहे. काँग्रेसच्या या आडकाठीमुळेच राममंदिराच्या खटल्याला विलंब होत आहे, असेही मोदी म्हणाले. मोदी यांनी गांधी परिवार, काँग्रेसवर आरोप करणे आता तरी थांबवायला हवे. असे अडथळे व अडचणींचा पाढा वाचण्यासाठी तुम्हाला सत्ता सोपवलेली नाही. राममंदिरास काँग्रेसचा, उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीचा अडथळा होता म्हणून तर लोकांनी त्यांना सत्तेतून बेदखल केले व भाजपची सत्ता आणली. त्यामुळे आता काँग्रेसवर खापर फोडणे थांबवा. मंदिर बांधण्यासाठी जी हिंमत लागते ती नसल्याने लोकांनी काँग्रेसला धूळ चारली व हिंमतबाज छप्पन इंचवाल्यांच्या हाती कारभाराच्या किल्ल्या सोपवल्या. तरीही त्यांना जळी, स्थळी, काष्ठी,… काँग्रेस दिसत असेल तर तुमच्या छातीचे मोजमाप जनतेला पुन्हा घ्यावे लागेल.

एक कायदाच राममंदिरासाठी बनवायचा आहे. चौकटीचे काय घेऊन बसलात. तुम्ही सर्व काही करता, पण राममंदिराचा विषय काढला की विंचू चावल्याचा झटका बसल्यासारखे कळवळता, पळून जाता. राममंदिराची निर्मिती ही तुम्हाला कडू जहाल विषासारखी वाटत असेल, पण हे हलाहल पचवावेच लागेल. मंदिरप्रश्नी जो आडमुठी भूमिका घेईल तो राजकारणातून कायमचा संपेल. राहुल गांधींना याची जाणीव आहे. राममंदिरप्रश्नी सगळ्यात मोठा अडथळा काँग्रेसचा वगैरे नसून राजकीय इच्छाशक्तीचा आहे. राहुल गांधींचे अस्तित्व ते किती? काँग्रेसचा जीवदेखील तोळामांसा. मग त्यांना इतके महत्त्व का देता? राममंदिराची घोषणा करा. काँग्रेस पाचोळ्यासारखी उडून जाईल, मात्र काँग्रेसच्या खांद्यावर मंदिराची बंदूक ठेवून राजकारण केलेत तर तुम्हीच उडून जाल, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com