'भोग्यांना हाताशी धरून भाजप स्वतःला...'सेनेचा हल्लाबोल

सामना अग्रलेखातून भाजपसह बंडखोर एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल
Sanjay Raut on BJP
Sanjay Raut on BJPe sakal

गुवाहाटीच्या ध्यान शिबिरात जे लोक पळवून, मारून बसवले आहेत, त्यांचा संबंध योगाशी नसून भोगाशी आहे. अशाच भोग्यांना हाताशी धरून भाजप स्वतःला महाशक्ती म्हणून मिरवत आहे. महाशक्तीच्या सहकार्याने गुवाहाटीमधील बाबा ‘योगराज’ हे ठाकरे सरकार घालविण्यासाठी ध्यानसाधना करीत आहेत. अशा शब्दात सामना अग्रलेखातून भाजपवर हल्ला(shivsena critizsize bjp and Eknath Shinde in samana maharashtra politics) चढवला आहे.

पाकिस्तानला खरेच धडा शिकविला असता तर...

महाराष्ट्राचेच नव्हे, तर अखिल हिंदुस्थानचे डोळे ज्याकडे लागले होते ते कार्य पूर्ण होताना दिसत आहे. सुरतच्या ‘मेरिडिअन’ हॉटेलमध्ये अर्धवट राहिलेले ‘चिंतन’ कार्य अखेर ईशान्येकडील गुवाहाटी शहरात मार्गी लागले. गुवाहाटीस्थित ‘रॅडिसन ब्लू’ योग शिबिरात महाराष्ट्रातील चाळिसेक आमदारांचे सखोल चिंतन शिबीर सुरू आहे. त्या शिबिरात असा ठराव संमत झाला की, ‘‘भारतीय जनता पक्ष एक महाशक्ती आहे. ही महाशक्ती आपल्या पाठीशी असल्याने आपल्याला चिंता नाही.’’ आसामच्या योग शिबिरात जे चाळिसेक योगार्थी आहेत ते कोण व कोठून आले, ते आता अखिल हिंदुस्थानास समजले.

शिवसेनेचे पळवून नेलेले चाळिसेक आमदार गुवाहाटीमध्ये असून त्यांची चोख व्यवस्था भारतीय जनता पक्षाने केल्याने या महाशक्तीचा काही जणांना नव्याने साक्षात्कार झालेला दिसतो. योग शिबिराच्या प्रमुखांनी त्यांची भूमिका अधिक सुस्पष्ट करताना जाहीर केले की, ‘‘भाजप या महाशक्तीने पाकिस्तानला धडा शिकवला आहे. त्या महाशक्तीचा आपल्याला पाठिंबा आहे.’’ आसामातून अनेक दिव्य विचार सध्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचत आहेत. हिंदुत्वापासून स्वाभिमानापर्यंत नव्याने साक्षात्कार होत आहे

बरं, या महाशक्तीने पाकिस्तानला धडा शिकविला म्हणजे काय केले? योग शिबिरातील मंडळींना पाकिस्तानबाबत जे ज्ञान मिळत आहे, त्यावर काय बोलावे? पाकिस्तानची जिरवली किंवा पाकिस्तानला धडा शिकवल्याचे कोणते नवे पुरावे गुवाहाटीच्या योग शिबिरात समोर आणले? कश्मीरात पाकिस्तानची घुसखोरी कायम आहेच, पण मोठय़ा प्रमाणात हिंदू पंडितांचे हत्याकांड सुरू आहे. हिंदूंनी पलायन केले व जाताना भारतीय जनता पक्षाला शाप दिले. स्वतःस हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे सरकार दिल्लीत असताना कश्मीरमधून हिंदूंना पलायन करावे लागते, हीच काय तुमची महाशक्ती? असा भाजपला सवाल करत पाकिस्तानला खरेच धडा शिकविला असता तर...असा पुनरसावल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com