पहिला निर्णय शिवचरणी!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगडाच्या संवर्धनासाठी २० कोटी रुपयांचा निधी देण्याचा पहिला निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीबाबत दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगडाच्या संवर्धनासाठी २० कोटी रुपयांचा निधी देण्याचा पहिला निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीबाबत दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची पहिली बैठक सह्याद्री अतिथीगृहावर झाली. त्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. रायगडाच्या संवर्धनाचे काम अगोदरपासून सुरू आहे. त्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी आधीच दिला होता. संपूर्ण कामासाठी सुमारे ६०६ कोटी रुपयांची गरज लागणार आहे. त्यातील आणखी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे ठाकरे यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत जाहीर केले.

‘‘महाराष्ट्राच्या जनतेला नमस्कार करतो आणि विश्वास देतो, की हे सरकार सर्वसामान्य माणसाचे असेल. राज्यात कुणालाही दहशत वाटेल असे वातावरण हे सरकार राहू देणार नाही. आज झालेल्या पहिल्याच बैठकीत पहिलाच प्रस्ताव शिवछत्रपतींच्या रायगडासाठी निधी देण्याबाबतचा होता. याचा मला विशेष आनंद वाटतो,’’ असे ठाकरे म्हणाले.

‘‘दुसरा महत्त्वाचा मुद्दा अर्थातच शेतकऱ्यांचा आहे. महाराष्ट्रातील शेतकरी त्रस्त आहे, अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात आहे. आत्तापर्यंत शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीची व त्यांच्यासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची वास्तव माहिती देण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले आहेत. एक ते दोन दिवसांत ते चित्र स्पष्ट होईल. शेतकऱ्यांना तुटपुंजी नाही, तर मोठी मदत करणार येणार आहे. येत्या दोन दिवसांत त्याचा निर्णय घेण्यात येईल,’’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘‘आजपर्यंत काय काय घडलं आहे? शेतकऱ्यांना काय मदत मिळाली? मिळाली नाही मिळाली? काहींना कर्जमाफीची पत्रं मिळाली आहेत. मात्र, कर्जमाफी दिलेली नाही. मला वास्तव जाणून घ्यायचं आहे. घोषणांचा पाऊस झाला आहे, पदरात काही पडलेले नाही, हे आम्हाला समजले आहे,’’ असाही टोला उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

‘‘शेतकऱ्यांना मदत करणे, हे आमचे कर्तव्य नाही; तर तो आमचा निश्‍चय आहे,’’ असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. ‘‘आपला महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे राज्य करू. महाराष्ट्राच्या वैभवात भर घालू,’’ असा विश्‍वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

याच पत्रकार परिषदेत शिवसेना आता ‘सेक्‍युलर’ झाली आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला तेव्हा, ‘सेक्‍युलर’ म्हणजे काय? त्याची व्याख्या तुम्हीच आम्हाला सांगा, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी प्रतिप्रश्न करून पत्रकारांना निरुत्तर केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena First decision