नंदनवनात स्वातंत्र्याची पहाट; शिवसेनेची स्तुतीसुमने

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

या 370 कलमाच्या सैतानामुळेच जम्मू-कश्मीर भारताच्या मुख्य प्रवाहापासून तुटले होते. याच कलमामुळे कश्मीरातील फुटीरतावादी पाकिस्तानच्या प्रेमात पडून भारतातून फुटून बाहेर पडण्याचे आणि ‘वेगळे राष्ट्र’ बनवण्याचे मनसुबे आखत होते. कश्मीरात मागील काही दशकांमध्ये जो दहशतवाद फोफावला त्याचे मूळ 370 आणि 35‘अ’ या कलमांमध्येच दडले होते. त्या मुळावरच आज सरकारने घाला घातला. कलम 370 च्या भस्मासुरामुळेच एकाच देशात दोन निशाण, दोन विधान आणि दोन पंतप्रधान करण्याची नामुष्की भारतावर ओढवली होती. तो भस्मासुर आज कायमचा गाडला गेला आहे.

मुंबई : धमक्यांना भीक न घालता जम्मू-कश्मीरचे फाजील लाड करणारे घटनेतील 370 हे वादग्रस्त कलम सरकारने मुळासकट उखडून फेकून दिले आहे. कलम 370 हा देशाशी केलेला विश्वासघात होता. भारताचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वावर लागलेला तो कलंक होता. तो कलंक आज नष्ट झाला आहे. काश्मीरमध्ये स्वातंत्र्याची पहाट झाल्याचे स्तुतिसुमने शिवसेनेने उधळली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच काश्मीरचे विभाजन करण्याचाही निर्णय घेतला. त्यामुळे शिवसेनेकडून सरकारची स्तुती करण्यात येत आहे. शिवसेनेने सामना या मुखपत्रातील अग्रलेखातून मोदी आणि शहा यांची स्तुती केली आहे. 

शिवसेनेने म्हटले आहे, की या 370 कलमाच्या सैतानामुळेच जम्मू-कश्मीर भारताच्या मुख्य प्रवाहापासून तुटले होते. याच कलमामुळे कश्मीरातील फुटीरतावादी पाकिस्तानच्या प्रेमात पडून भारतातून फुटून बाहेर पडण्याचे आणि ‘वेगळे राष्ट्र’ बनवण्याचे मनसुबे आखत होते. कश्मीरात मागील काही दशकांमध्ये जो दहशतवाद फोफावला त्याचे मूळ 370 आणि 35‘अ’ या कलमांमध्येच दडले होते. त्या मुळावरच आज सरकारने घाला घातला. कलम 370 च्या भस्मासुरामुळेच एकाच देशात दोन निशाण, दोन विधान आणि दोन पंतप्रधान करण्याची नामुष्की भारतावर ओढवली होती. तो भस्मासुर आज कायमचा गाडला गेला आहे. हिंदुस्थानचा कुठलाही नागरिक जम्मू-कश्मीरात जाऊन जमीनजुमला खरेदी करू शकत नव्हता, घरदार घेऊ शकत नव्हता, उद्योगधंदा सुरू करू शकत नव्हता. इतकेच काय, तिथे जाऊन कायमस्वरूपी वास्तव्यही करू शकत नव्हता. एखाद्या विदेशात गेल्याप्रमाणे केवळ पर्यटक म्हणूनच कश्मीरात जावे, असे बंधन या देशातील जनतेवर घालण्यात आले. पाकिस्तानच्या घुसखोर अतिरेक्यांना वर्षानुवर्षे पोसणाऱ्या कश्मीरात भारताच्या नागरिकांना मात्र कुठलीच मुभा नव्हती. ज्यामुळे कश्मीरातील फुटीरतावादी माजले होते, ते कलम 370 रद्द व्हावे हे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. शिवसेनाप्रमुखांचे आणि देशातील तमाम राष्ट्रवादी जनतेचे हे स्वप्न आज साकार झाले आहे.

370 कलम रद्द करण्याचे आश्वासन शिवसेना-भाजप युतीने लोकसभा निवडणुकीत दिले होते, ते आज पूर्ण झाले. देशात एकता आहे, असा संदेश देणारा हा निर्णय आहे. ही कामगिरी साधीसुधी नव्हे तर अलौकिक आहे. ‘370 को हाथ लगायेंगे तो हाथ जला देंगे’ अशा धमक्या कश्मीरातील देशद्रोही नेत्यांनी दिल्या होत्या. दम असेल तर या पाकधार्जिण्या नेत्यांनी आता आगलावू भाषा वापरून दाखवावीच. कश्मीरात आधीच पोहोचलेल्या फौजा त्यांना भस्मसात केल्याशिवाय राहणार नाहीत. 370 कलम रद्द करण्याचा निर्णय घेऊन 70 वर्षांपासून हिंदुस्थानच्या माथ्यावर लागलेला कलंक सरकारने आज नष्ट केला. कश्मीरचे खऱ्या अर्थाने आता हिंदुस्थानात विलीनीकरण झाले आहे. 9 ऑगस्टचा क्रांतिदिन, 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन आणि आता कश्मीरला मोकळा श्वास देणाऱ्या 5 ऑगस्टच्या ऐतिहासिक दिनाने ऑगस्ट महिन्याचे पावित्र्य आणखी वाढवले आहे. देशद्रोहय़ांच्या छाताडावर बसून बजावलेल्या या धाडसी, साहसी, अद्भुत आणि अचाट कामगिरीबद्दल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, दीनदयाल उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी आणि अटलबिहारी वाजपेयीदेखील स्वर्गातून आज या सरकारवर नक्कीच पुष्पवृष्टी करत असतील! अखंड हिंदुस्थानचे निम्मे स्वप्न आज पूर्ण झाले, भविष्यात पाकव्याप्त कश्मीरच नव्हे तर पाकिस्तानही विलीन करून घेण्याची ताकद आणि धमक या सरकारमध्ये आहे, याची नोंद शेजारच्या बाटग्यांनी घ्यावी. कश्मीरचे सुंदर नंदनवन जिहादच्या नावाखाली 70 वर्षे जळत राहिले. कलम 370 च्या स्मशानातून कश्मीरच्या नंदनवनात  आता स्वातंत्र्याची पहाट नक्कीच उगवेल. काँग्रेससह देशातील तमाम राजकीय पक्षांनीही सगळे भेद बाजूला ठेवून या देशहिताच्या निर्णयाचे समर्थन करायला हवे. पण विरोधक खरेच सुधारतील काय?, असे शिवसेनेने म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena hails bjp government decision on article 370