congress, shivsena
congress, shivsena

शिवसेना-काँग्रेस नाते जुनेच; पक्षस्थापनेपासून अनेकवेळा... 

मुंबई : दोन टोकाच्या विचारसरणीचे काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्रित येण्याची चिन्हे निर्माण झाल्यानंतर या दोन विचारसरणी एकत्र कशा नांदणार, हा प्रश्‍न उपस्थित होत आहे. प्रत्यक्षात मात्र 70 च्या दशकात राज्यात असलेल्या काँग्रेसच्या सरकारसाठी काम करणारी संघटना म्हणूनच शिवसेनेला हिणवले जात असे. इतके की, वसंतराव नाईक यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात शिवसेनेला "वसंतसेना' असे नाव प्राप्त झाले होते. 

काँग्रेसची धर्मनिरपेक्ष विचारसरणी आणि शिवसेनेच्या हिंदुत्ववादी विचारसरणीचा मेळ सरकार स्थापनेसाठी कसा केला जाऊ शकतो, यावर काथ्याकूट सुरू आहे. मात्र, राज्यात सुरुवातीपासूनच असलेल्या काँग्रेससोबत जमवून घेतच शिवसेनेने स्वत:ची जागा तयार केली आहे. राजकीय अभ्यासक प्रकाश पवार यांनी काँग्रेस आणि शिवसेनेच्या आघाडीविषयी प्रतिक्रिया व्यक्‍त करताना स्पष्ट केले की, भाजप आणि शिवसेनेच्या हिंदुत्वामध्ये फरक आहे. उद्धव ठाकरेंचे सौम्य हिंदुत्व आणि "राष्ट्रवादी'चे शिवस्वराज्य, यामध्ये फार अंतर नसल्याने हिंदुत्वाचा मुद्दा आघाडीमध्ये दुय्यम ठरणार आहे. 

1966 मध्ये स्थापनेनंतर शिवसेनेने 1968 मध्ये पहिली युती प्रजा समाजवादी पक्षासोबत केली होती. ज्येष्ठ समाजवादी नेते मधु दंडवते यांच्या नेतृत्वाखालील प्रजा समाजवादी पक्षासोबत हातमिळवणी करून शिवसेनेने मुंबई महापालिका निवडणूक लढविली होती. मात्र, ही युती दोन वर्षांतच तुटली. काँग्रेसने देशावर लादलेल्या आणीबाणीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर पाठिंबा दिला होता. मात्र, आणीबाणी उठल्यानंतर 1978 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा एकही उमेदवार काँग्रेसच्या विरोधात निवडून आला नाही. त्याचवेळी काँग्रेसच्या विरोधात उमेदवार उभे करून आपण निवडणुका जिंकणार नाही. मात्र, विधानसभेच्या दिशेने जाण्यासाठी काहीतरी मार्ग निघायला पाहिजे, यासाठी ठाकरेंनी प्रयत्न सुरू केले.

1980 साली शरद पवारांच्या नेतृत्वाखालील सरकार इंदिरा गांधी यांनी बरखास्त केल्यानंतर पुन्हा निवडणुका झाल्या. या वेळी बाळासाहेब ठाकरेंनी उमेदवार उभे करण्याऐवजी काँग्रेसचा प्रचार करण्याचा करार केला आणि काँग्रेसला पाठिंबा दिला. त्याबदल्यात विधान परिषदेवर दोन आमदार निवडून देण्याची मागणी केली. त्या निवडणुकीत मुंबईत कुर्ला-नेहरूनगर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार बाबासाहेब भोसले यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी प्रचार सभा घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्री झालेले ए. आर. अंतुले यांच्यासोबत बाळासाहेब ठाकरेंचे मैत्रीचे संबंध होते. 
त्यापूर्वी, 1970 मध्ये मुंबई महापालिकेत महापौर बनविण्यासाठी शिवसेनेने इंडियन युनियन मुस्लिम लीगसोबतही युती केली होती. राजकीय अपरिहार्यता म्हणून बाळासाहेब ठाकरे आणि "आययूएमएल'चे नेते गुलाम मोहम्मद बनातवाला यांनी एकत्र सभादेखील घेतल्या होत्या. त्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकीत आघाडी केली होती. त्यानंतर शिवसेना पहिल्यांदा 1985 मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक लढवून स्वबळावर निवडून आल्यानंतर शिवसेनेने विधानसभेसाठी भाजपबरोबर युती करीत हिंदुत्वाची शाल अंगावर घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com