भाजपने एकदा 'ही' हिंमत करून पाहावीच : संजय राऊत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

रथाचे चाक अडकले आहे व भाजपचे संकटमोचक कृष्ण अमित शहा हे रथचक्र उद्धारासाठी अद्यापि पुढे का आले नाहीत?. गोपीनाथ मुंडे आज हयात असते तर महाराष्ट्राचे चित्र वेगळे दिसले असते व मुंडे मुख्यमंत्री झालेच असते तरी युतीतील आजची कटुता दिसली नसती. शिवसेना सोबत नसती तर भाजपाला 75 च्या वर जागा मिळाल्या नसत्या. कलियुगच खोटे आहे.

मुंबई : सध्या भाजप नेते सुधीर मुनगंटीवार दाखवतात हा अहंकाराचा भाग आहे. राष्ट्रपती राजवट लादून राज्य करणे हा भाजपचा शतकातील सर्वात मोठा पराभव ठरेल. अशी हिंमत एकदा करून पाहावीच, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

राज्यात एकीकडे सत्तावाटपावरुन भाजप-शिवसेनेमध्ये आधीच संघर्षाचे चित्र असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी 'सामना' वृत्तपत्रातील रोखठोक या सदरातून, “राष्ट्रपती राजवट लादण्याची हिंमत भाजपाने एकदा करून पाहावीच”, असं म्हणत भाजपला इशारा दिला आहे. वेळेत सत्ता स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असे वक्तव्य भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते. ‘अहंकाराच्या चिखलात रथचक्र! एक सरकार बनेल काय?’ या मथळ्याखाली त्यांनी लेख लिहिला आहे.

संजय राऊत यांनी लेखात म्हटले आहे, की रथाचे चाक अडकले आहे व भाजपचे संकटमोचक कृष्ण अमित शहा हे रथचक्र उद्धारासाठी अद्यापि पुढे का आले नाहीत?. गोपीनाथ मुंडे आज हयात असते तर महाराष्ट्राचे चित्र वेगळे दिसले असते व मुंडे मुख्यमंत्री झालेच असते तरी युतीतील आजची कटुता दिसली नसती. शिवसेना सोबत नसती तर भाजपाला 75 च्या वर जागा मिळाल्या नसत्या. कलियुगच खोटे आहे. स्वप्नात दिलेला शब्द पाळण्यासाठी राजा हरिश्चंद्राने राज्य सोडले, पित्याने सावत्र आईला दिलेल्या शब्दापोटी श्रीरामाने राज्य सोडून वनवास पत्करला. त्याच भारतात दिलेला शब्द फिरवण्याचे ‘कार्य’ भारतीय जनता पक्षाने पार पाडले आहे. हे सर्व एका मुख्यमंत्रीपदावरून घडत आहे व राज्यात सत्तास्थापना खोळंबली आहे. उद्धव ठाकरे यांनी 31 तारखेच्या दुपारी स्पष्टपणे सांगितले, ”मुख्यमंत्रीपदाचा अमरपट्टा घेऊन आलोय असे कुणी समजू नये.” त्यांचे हे विधान ज्यांना समजले त्यांनी पुढच्या रामायणाचे भान ठेवायला हवे. मीच पुन्हा मुख्यमंत्री होईन असे देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. देवेंद्र पुन्हा मुख्यमंत्री होतील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सांगितले. तरीही रथाचे चाक अडकले आहे व भाजपचे संकटमोचक कृष्ण अमित शहा हे रथचक्र उद्धारासाठी अद्यापि पुढे का आले नाहीत, हे रहस्य आहे.

हे आहेत पर्याय
महाराष्ट्रात सध्याच्या परिस्थितीत काय घडू शकेल ते पहा-
डाव 1 – शिवसेनेस वगळून भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तास्थापनेचा दावा करू शकते. भाजपकडे 105 आमदार आहेत. 40 जास्त लागतील. ते शक्य झाले नाही तर विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी त्यांचे सरकार कोसळेल. 40 जास्त मिळवणे हे अशक्यच दिसते.
डाव 2 – 2014प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्षास पाठिंबा देईल. राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होईल. त्या बदल्यात सुप्रिया सुळे यांना केंद्रात व अजित पवारांना राज्यात पद दिले जाईल.
पण 2014 साली केलेली ही घोडचूक श्री. पवार पुन्हा करतील याची सुतराम शक्यता नाही. पवारांना भाजपविरोधात यश मिळाले आहे व महाराष्ट्राने त्यांना डोक्यावर घेतले आहे. आज ते शिखरावर आहेत. त्यांच्या यशाची माती होईल.
डाव 3 – भाजप विश्वासदर्शक ठरावात अपयशी ठरल्यावर दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेना सरकार स्थापनेचा दावा करू शकेल. राष्ट्रवादी (54), काँग्रेस (44) व इतरांच्या मदतीने बहुमताचा आकडा 170पर्यंत जाईल. शिवसेना स्वतःचा मुख्यमंत्री करू शकेल व सरकार चालवण्याचे साहस त्यांना करावे लागेल. त्यासाठी तीन स्वतंत्र विचारांच्या पक्षांना समान किमान सामंजस्याचा कार्यक्रम तयार करून पुढे जावे लागेल. अटलबिहारी वाजपेयींनी जसे सरकार दिल्लीत चालवले तसे सगळय़ांना धरून पुढे जावे लागेल. त्यात महाराष्ट्राचे हित आहे.
डाव 4 – भारतीय जनता पक्ष व शिवसेनेस नाइलाजास्तव एकत्र येऊन सरकार स्थापन करावे लागेल. त्यासाठी दोघांनाही चार पावले मागे यावे लागेल, शिवसेनेच्या मागण्यांवर विचार करावा लागेल, मुख्यमंत्रीपदाची विभागणी करावी लागेल व हाच एक उत्तम पर्याय आहे; पण अहंकारामुळे ते शक्य नाही.
डाव 5 – ईडी, पोलीस, पैसा, धाक यांचा वापर करून इतर पक्षांचे आमदार फोडून भाजपास सरकार बनवावे लागेल (त्यासाठी ‘ईडी’चा एक प्रतिनिधी मंत्रिमंडळात सामील करावा लागेल), पण ‘पक्षांतर’ करणाऱ्यांची काय अवस्था झाली हे मतदारांनी दाखवून दिल्याने फाटाफूट घडवून बहुमत मिळवणे, मुख्यमंत्रीपद मिळवणे सोपे नाही. या सगळय़ात मोदी यांच्या प्रतिमेचे भंजन होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena MP Sanjay Raut writes article about alliance with BJP