Shivsena: आयोगाची मॅचफिक्सिंग, लोकशाहीचा मुडदा; आयोगाच्या निर्णयावर सामनातून निशाणा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena: आयोगाची मॅचफिक्सिंग, लोकशाहीचा मुडदा; आयोगाच्या निर्णयावर सामनातून निशाणा!

Shivsena: आयोगाची मॅचफिक्सिंग, लोकशाहीचा मुडदा; आयोगाच्या निर्णयावर सामनातून निशाणा!

काल रात्री उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पक्ष चिन्हावर अत्यंत महत्वाचा निर्णय आला. निवडणूक आयोगाकडून काल रात्री धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आलं. त्यानंतर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून काय वाचायला मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. आजच्या सामनाच्या अग्रलेखात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचा दसरा मेळावा आणि यांच्यासह भाजपच्या दिल्लीतील बड्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. हा लोकशाहीचा मुडदा पाडण्याचाच प्रकार असून अंधेरी पोटनिवडणुकीसाठी आयोगाने केलेली ही मॅचफिक्सिंग आहे अशी टीका शिवसेनेने केली आहे.

काय आहे सामनाच्या अग्रलेखात?

केंद्रीय निवडणूक आयोगाने फक्त चार तासांच्या बैठकीत धक्कादायक निर्णय घेतला आणि शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्हच गोठवले. आयोग एवढय़ावरच थांबला नाही, तर शिवसेना हे नाव स्वतंत्रपणे वापरण्यास मनाई करणारा अंतरिम आदेशही शिवसेनेसह शिंदे गटाला दिला. हे दोन्ही निर्णय अंधेरी पोटनिवडणुकीसाठी असल्याचे आयोगाने म्हटले आहे. सोमवारपर्यंत पक्षाचे नवीन नाव आणि चिन्ह सुचवावे, असे निर्देशही आयोगाने दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे अवघ्या महाराष्ट्रात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. हा तर लोकशाहीचा मुडदा पाडण्याचाच प्रकार असून अंधेरी निवडणुकीसाठी आयोगाने केलेली ही मॅचफिक्सिंग असल्याची संतप्त प्रतिक्रिया जनसामान्यांतून व्यक्त होत आहे.

हेही वाचा: Sharad Pawar : "ज्याची भिती होती..."; सेनेचे चिन्ह गोठवल्यानंतर पवारांची प्रतिक्रिया

शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे गटाकडून अंधेरी पोटनिवडणुकीसाठी धनुष्यबाण हे चिन्ह मिळावे असा दावा करणारी याचिका निवडणूक आयोगापुढे करण्यात आली होती. यासंदर्भात शिवसेना तसेच शिंदे गटाला शनिवारी दुपारी दोन वाजेपर्यंत आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश आयोगाने दिले होते. त्यानुसार दोन्ही बाजूंकडून शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावर दावा सांगणारी कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली. यानंतर निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या उपस्थितीत पेंद्रीय निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक दिल्लीत पार पडली. सुमारे चार तास झालेल्या या बैठकीनंतर शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह तात्पुरते गोठविण्याचा अंतरिम निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा: Uddhav Thackeray: निवडणूक आयोगाकडून चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया म्हणाले...

धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठविण्याचा निर्णय तात्पुरत्या स्वरूपाचा असून केवळ आगामी निवडणुकीपुरता मर्यादित आहे. शिवसेना पक्ष खरा कुणाचा? याबाबत निवडणूक आयोगापुढे सुरू असलेल्या प्रकरणावर अंतिम निर्णय होईपर्यंत निवडणुकीत कुणालाही शिवसेना हे स्वतंत्र नाव वापरता येणार नाही, मात्र शिवसेना या नावापुढे आपल्या गटाचे नाव देता येईल असे आयोगाने आदेशात म्हटले आहे. निवडणूक चिन्ह व पक्षाच्या नव्या नावासंदर्भात तीन पर्याय सोमवारी दुपारी 1 वाजेपर्यंत सुचवावेत असे निर्देश आयोगाने दिले आहेत.