
Navneet Rana : आमदार भाळला अन् राजकारणात चंचू प्रवेश झाला; शिवसेनेचे प्रत्युत्तर
Shivsena Sanjana Ghadi On Navneet Rana : हनुमान चालिसा पाठनापासून नवनीत राणा आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेला वाद काही केल्या संपुष्टात येताना दिसत नसून, शिवसेनेने नवनीत राणांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एक आमदार आपल्यावर भाळला आणि राजकारणात आपला चंचू प्रवेश झाला. अशा शब्दांत शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी यांनी नवनीत राणांवर हल्लाबोल करत राणांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. नवनीत राणा जरा तोंड सांभाळून बोला. कोण आहात आपण 'सी' ग्रेड फिल्ममध्ये काम करणाऱ्या एक अभिनेत्या असल्याची आठवणही घाडी यांनी करून दिली आहे. कितीही शूर्पणखा अंगावर आल्या तरी त्यांचं नाक कापू, अशा सणसणीत शब्दात घाडी यांनी नवनीत राणांवर आगपाखड केली आहे.
हनुमान चालिसा पठण करू न दिल्यामुळेच राज्यातील उद्धव ठाकरेंचे सरकार पडले, ही तर सुरूवात आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा सर्वनाश होणार, अशी टीका खासदार नवनीत राणा यांनी केली होती. त्यावर शिवसेना प्रवक्त्या घाडी यांनी जोरजार प्रत्युत्तर देत राणांचा समाचार घेतला आहे.
कावळीणीच्या शापाने गाय मरत नसते बाई..! त्यामुळे माझ्या शापामुळे माझ्यावर झालेल्या अन्यायामुळे शिवसेनेला कार्यकर्ता उरला नाही, अशा फाजील वल्गना करून अशी थेरं महाराष्ट्राला दाखवू नका असा सल्लाही घाडी यांनी दिला आहे. तसेच शिवसेना ही कालही मजबूत होती आजही मजबूत असून, तुमच्यासारख्या 100 दुश्मनांच्या छाताडावर उभी राहून पुन्हा एकदा या मुंबई, महाराष्ट्रावर आपला भगवा डौलाने फडकत ठेवणार असल्याचा विश्वास घाडी यांनी व्यक्त केला आहे.
काय संबंध आपला हनुमान चालीसाशी? हनुमानाला हनुमान का म्हणतात? याचे साधे उत्तर मुलाखतीमध्ये आपल्याला देता आले नाही आणि म्हणे मी हनुमान भक्त, असे घाडी म्हणाल्या. भाजपाच्या सी, डी टीम म्हणून काम करणाऱ्या मनसेने भोंग्यांच्या विषयासाठी मशिदीसमोर हनुमान चालीसा वाचा म्हणून सांगितले. तुम्ही डायरेक्ट मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचायला निघालात. ज्या बाईला लाखो शिवसेनिकांचे श्रद्धास्थान असलेले मातोश्री, मंदिर आणि मशिदीतील फरक कळत नाही, त्या बाईला आणखी कशी वागणूक मिळायला पाहिजे होती, असेही घाडी म्हणाल्या.