पुस्तकावरून भाजपची तोंडे ‘म्यान’ झाली म्हणून...; शिवसेनेचा वार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर करण्यात आल्याने महाराष्ट्रात संतापाची वावटळ उठली आहे, त्यात काही चुकीचे आहे असे वाटत नाही. ही वावटळ पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात नाही हे समजून घेतले पाहिजे. मोदी यांच्या पाठीमागे हे सर्व उद्योग सुरू आहेत. ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ असे एक पुस्तक भाजपच्या नव्या कोऱ्या चमच्याने लिहिले.

मुंबई : 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' हे पुस्तक म्हणजे ढोंग व चमचेगिरीचा सर्वोच्च नमुना आहे. महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनी या ढोंगी प्रकाराचा खुल्या दिलाने निषेध केला पाहिजे. आता भाजपवाले म्हणतात, गोयलशी आमचा काय संबंध? संबंध नाही कसा? पक्ष कार्यालयात पुस्तक प्रसिद्ध झाले व भाजपचे नेते त्या वेळी हजर होते. हे गोयल आजही म्हणतात, ‘‘आमचे शिवाजी फक्त नरेंद्र मोदीच!’’ आता यावर महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनीच बोलायचे आहे. 11 कोटी जनता बोलते आहेच. छत्रपती शिवरायांचे वारसदारही आता चिडले आहेत. छत्रपती शिवरायांचा अपमान झाला आहे. शिवरायांच्या वंशजांनी म्यानातून सपकन तलवार काढावी. ती आता काढली आहे व त्याबद्दल त्यांचे आभार! भाजपची तोंडे ‘म्यान’ झाली म्हणून आम्ही हे शिवव्याख्यान मांडले, असा टोला शिवसेनेने लगाविला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भाजप नेते जयभगवान गोयल यांनी लिहिलेले आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाचे भाजप मुख्यालयात प्रकाशन झाल्यानंतर जोरदार टीका करण्यात आली होती. अखेर सोमवारी रात्री भाजपने हे पुस्तक मागे घेतल्याचे जाहीर केले. शिवसेनेने आज (मंगळवार) 'सामना' या मुखपत्रातील अग्रलेखातून त्यांना लक्ष्य केले आहे.

Breaking : 'वादग्रस्त पुस्तकाशी संबंध नाही'; भाजपचे 'हात वर', तर लेखकाचा माफीनामा 

शिवसेनेने म्हटले आहे, की छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर करण्यात आल्याने महाराष्ट्रात संतापाची वावटळ उठली आहे, त्यात काही चुकीचे आहे असे वाटत नाही. ही वावटळ पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात नाही हे समजून घेतले पाहिजे. मोदी यांच्या पाठीमागे हे सर्व उद्योग सुरू आहेत. ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ असे एक पुस्तक भाजपच्या नव्या कोऱ्या चमच्याने लिहिले. त्या पुस्तकाचे प्रकाशन भाजपच्या दिल्लीतील कार्यालयात झाले. महाराष्ट्राच्या अकरा कोटी जनतेला हे अजिबात आवडले नाही. मोदी हे कर्तबगार आणि लोकप्रिय नेते आहेत, देशाचे पंतप्रधान म्हणून आज त्यांना तोड नाही, पण तरीही ते देशाचे छत्रपती शिवाजी आहेत काय? त्यांना छत्रपती शिवरायांचे स्थान देणे योग्य आहे काय? याचे उत्तर एका सुरात ‘नाही;नाही!’ असेच आहे. त्यांची तुलना जे शिवाजी महाराजांशी करतात त्यांना छत्रपती शिवाजीराजे समजलेच नाहीत. पंतप्रधान मोदी यांनाही ही तुलना आवडली नसेल, पण फाजील उत्साही भक्त आपल्या नेत्यांना अडचणीत आणतात तसे आता झाले आहे. शिवरायांनी औरंगजेबाच्या मस्तकावर पाय देऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले. तसेच ‘‘औरंगशहाला स्वतःलाच दिल्लीत कोंडीन’’ हे छत्रपतींचे वाक्य इंग्रजी रेकॉर्डस्मध्ये आहे. हीच शिवरायांची प्रतिमा आहे.

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला CAA वर बोलले, म्हणाले...

बखरकारांप्रमाणे शंकराचा अवतार न म्हणता तो शिवरायांना विष्णूचा अवतार म्हणतो. आता ज्यांनी मोदी यांना ‘आज के शिवाजी’ संबोधिले त्याच लोकांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी यांना विष्णूचे तेरावे अवतार अशी मान्यता दिली. काल विष्णूचे अवतार, आज ‘शिवाजी.’ यात देश, देव, धर्माचाही अपमान आहेच, पण मोदी यांचीही कोंडी होत आहे. ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ हे पुस्तक म्हणजे ढोंग व चमचेगिरीचा सर्वोच्च नमुना आहे. महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनी या ढोंगी प्रकाराचा खुल्या दिलाने निषेध केला पाहिजे. दिल्लीतील काही नेत्यांनी वीर सावरकरांचे चरित्र वाचावे व दिल्लीतील भाजप पुढाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यावेत. म्हणजे त्यांचे गैरसमज दूर होतील. महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांचे सर्व गाद्यांचे वारसदार आज भाजपमध्ये आहेत. प्रत्येक गादीबद्दल आम्हाला आदर आहे. महाराष्ट्र संतापला असताना शिवरायांच्या वारसदारांनाही आता ठोस भूमिका घ्यावी लागेल. छत्रपतींनी मोगलांच्या विरोधात भूमिका घेतली म्हणून ‘स्वराज्य’ स्थापन झाले. त्यांनी चाकरीचा मार्ग स्वीकारला असता तर महाराष्ट्र निर्माण झाला नसता. शिवरायांनी दिल्लीश्वरांच्या मनसबदारीवर लाथ मारली म्हणून ‘मराठी बाणा’ आजही जागा आहे. शिवराय शूर होते व संयमी होते म्हणून त्यांनी स्वराज्य निर्माण केले. महाराष्ट्र सदनावर ज्यांनी हल्ला केला त्या जय भगवान गोयल यांनी हे पुस्तक लिहिले. सदनावरील हल्ल्यात तेव्हा शिवरायांच्या प्रतिमेसही तडे गेले होते, असे शिवसेनेने म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena targets BJP for comparison on Shivaji Maharaj and Narendra Modi