भाजपच्या चेहऱ्यावरचे मुखवटे संपता संपेना; शिवसेनेचा टोला

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

मुंबई : शिवसेना 2014 मधली आजही तशीच आहे. भाजपला '105' असूनही विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली. कारण, भाजपाच्या चेहऱ्यावरचे मुखवटे संपता संपत नाहीत, बोलायचे एक व करायचे दुसरेच हे 2019 मध्येही झाले, असा टोला शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपला लगाविला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकताच 2014 मध्येही शिवसेनेने सत्तास्थापनेसाठी काँग्रेसला प्रस्ताव दिल्याचे म्हटले होते. यावरून भाजपने शिवसेनेला लक्ष्य केले होते. यावर शिवसेनेने 'सामना' या मुखपत्रातील अग्रलेखातून भाजपवर टीका केली आहे. 

शिवसेनेने म्हटले आहे, की 2014 मध्ये शिवसेनेने काँग्रेसला सत्तास्थापनेचा प्रस्ताव दिल्याचा ‘स्फोट’ काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. त्याआधारे हे उत्खनन सुरू झाले आहे. चव्हाण यांचे म्हणणे असे की, 2014 साली विशिष्ट राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती. भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी आघाडी स्थापन करण्याचा शिवसेनेचा विचार होता. त्यादृष्टीने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याशी संपर्क साधला होता. आपण तो प्रस्ताव फेटाळला. चव्हाण यांच्या या दाव्याने फारशी खळखळ किंवा खळबळ होण्याचे कारण नव्हते. चव्हाणांचा दावा मुंबईतील सौम्य थंड हवेत वाहून गेला. भाजपाचे बोलायचे एक व करायचे दुसरेच. हे २०१९ सालीही झाले. त्याचे दृश्य फळ म्हणजे महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला व गुरूमहाराजांनी प्रयत्न केले तरी शरद पवारांनी भाजपची कुरघोडी होऊ दिली नाही. अर्थात सोनिया गांधी यांनी महाविकास आघाडी सरकारचा प्रस्ताव फेटाळला नाही. २०१४ साली अशा प्रस्तावांना कागदाच्या चुरगळलेल्या कपट्याचीही किंमत नव्हती. याचा अभ्यास फडणवीस व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला तर स्वतःच्याच चेहऱ्यावरील मुखवटे खाजवत बसण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही.

२०१४ साली हे नाट्य घडत असताना शिवसेनेने चेहरा लपवलेला नव्हता. शिवसेना उजळ माथ्याने वावरत होती. मुखवट्याचे कारखाने भाजपकडेच होते. घोडेबाजारात मशहूर असलेले भाजपवाले साम-दाम-दंड-भेद नीतीचा वापर करून तोडफोड करायला तयार होते. फडणवीस यांनी आणखी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. २०१४ साली राष्ट्रवादीने भाजपला उघड पाठिंबा दिला व त्यामागे गुरूमहाराजांची इच्छा व दिशा होती. हे सत्य स्वीकारले तर शिवसेनेच्या चेहऱ्यावर ओरखडे मारण्यापेक्षा भाजपने स्वतःचा खरा चेहरा आरशात पाहणे गरजेचे आहे, असा टोलाही शिवसेनेने मारला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com