काँग्रेसने कार्यालयांना टाळं ठोकावं: शिवसेना

Congress
Congress

मुंबई : अध्यक्षपदावरुन सध्या काँग्रेस पक्षामध्ये जे काही चालले आहे त्यावर काँग्रेसच्या नेत्यांवर शिवसेनेने सडकून टीका केली आहे. काँग्रेस रसातळाला जायला गांधी परिवार जबाबदार नाही, तर त्याला काँग्रेसचे जुने नेतेच कारणीभूत आहेत. या काँग्रेस नेत्यांना जर आपला अध्यक्ष निवडता येत नसेल, तर त्यांनी आपल्या कार्यालयांना टाळे लावून कायमचे घरातच बसावे असा टोला शिवसेनेकडून लगाविण्यात आला आहे.

राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये राजीनामास्त्र सुरु आहे. यावरून विरोधी पक्षांकडून टीका होत असताना आता शिवसेनेनेही टीका करताना काँग्रेसला टाळं ठोका असे म्हटले आहे. 'सामना' या मुखपत्राच्या अग्रलेखातून त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे.

शिवसेनेने म्हटले आहे, की  काँग्रेस ही संघटनाच आता कोसळून गेली आहे. देशासमोर मोठे प्रश्न असताना जनता आशेने विरोधी पक्षांकडे बघत असते. मात्र, काँग्रेसचे नेते राहुल गांधींचीच मनधरणी करण्यात व्यस्त आहेत. विरोधी पक्षाची आपली जबाबदारी सक्षमपणे सांभाळण्याबाबतही कोणाला काही वाटत नाही. त्यामुळे काँग्रेसची आजची स्थिती म्हणजे त्यांना त्यांच्या लायकीप्रमाणे मिळालेले फळ आहे. काँग्रेसचे नेतेच सध्या गांधी परिवाराचा छळ करीत आहेत. घराणेशाहीच्या सावलीतून बाहेर पडावे असे राहुल गांधींनी ठरवले मात्र, त्यांच्या निर्णयाचे स्वागत करण्याऐवजी काँग्रेसच्या नेत्यांना घराणेशाहीच्या सावलीत बसायचे आहे त्यांना उन्हात काम करायचे नाही. पराभवाची जबाबदारी स्विकारुन राजीनामा दिल्याचे म्हणावे तर मग इतका वेळ का लावला? काँग्रेसची मानसिकता पंगू झाल्याने मोदी किंवा एनडीएशी टक्कर देण्याचे धाडस त्यांच्यात राहिले नव्हते म्हणूनच जनतेने त्यांना पायाखाली तुडवलं. काँग्रेसचे नेते गांधी कुटुंबाच्या कृपेने अय्याश आणि आयतोबा झालेत. कर्नाटकात काँग्रेसची प्रतिष्ठा आणि पत राखण्यासाठी एकही वरिष्ठ नेता धडपड करताना दिसत नाही. आगामी चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांबाबत काँग्रेसमध्ये चर्चा होताना दिसत नाही. मात्र, राहुल गांधींच्या राजीनाम्याबाबतच चर्चा सुरु आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com