esakal | हिंदुत्व पेलणे हा येरागबाळ्यांचा खेळ नाही; सेनेचा मनसेला टोला
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut, Raj Thackeray

‘मनसे’प्रमुखांना त्यांचे मुद्दे मांडण्याचा आणि पुढे रेटण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण त्यांनी आज घेतलेल्या भूमिका व त्याच विषयावर पंधरा दिवसांपूर्वी मांडलेली मते मेळ खात नाहीत. भाजपची शिवसेनाद्वेषाची मूळव्याध दुसऱ्या मार्गातून बाहेर येत आहे व हे त्यांचे खेळ जुनेच आहेत.

हिंदुत्व पेलणे हा येरागबाळ्यांचा खेळ नाही; सेनेचा मनसेला टोला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पेलणे हा काही येरागबाळ्यांचा खेळ नाही. तरीही या देशात कुणी हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी नवी घडी बसवत असेल तर त्यांचे स्वागत करण्याची दिलदारी आमच्याकडे आहेच. विचार ‘उसना’ असला तरी हिंदुत्वाचाच आहे. झेपेल तर पुढे जा, असा टोला शिवसेनेने आपल्या अग्रलेखातून मनसेला मारला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी अधिवेशन घेत आपल्या नव्या भगव्या झेंड्याचे अनावरण केले होते. यावेळी राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका स्वीकारल्याचं पहायला मिळाले होते. राज ठाकरे पक्षाच्या झेंड्यातही बदल केला. भगव्या रंगाच्या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असलेला मनसेच्या नव्या झेंड्याचं त्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. यावरून शिवसेनेने आपल्या सामना या मुखपत्रातील अग्रलेखातून टीका केली आहे.

हिंदुत्व चळवळीला राज्यघटना अमान्य; शशी थरूर यांचे वक्तव्य

शिवसेनेने म्हटले आहे, की ‘मनसे’प्रमुखांना त्यांचे मुद्दे मांडण्याचा आणि पुढे रेटण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण त्यांनी आज घेतलेल्या भूमिका व त्याच विषयावर पंधरा दिवसांपूर्वी मांडलेली मते मेळ खात नाहीत. भाजपची शिवसेनाद्वेषाची मूळव्याध दुसऱ्या मार्गातून बाहेर येत आहे व हे त्यांचे खेळ जुनेच आहेत. बाळासाहेबांच्या एखाद्या जुन्या भाषणाची जशीच्या तशी ‘कॉपी’ वाचून दाखवली गेली. मग त्यात मंदिराच्या आरत्या, मुसलमानांचे नमाज, बांगलादेशींची हकालपट्टी हे विषय जसेच्या तसे आलेच आहेत. देशात शिरलेल्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी मुस्लिमांना हाकलून द्या. नव्हे हाकलायलाच पाहिजे, याविषयी कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही, पण त्यासाठी एखाद्या राजकीय पक्षाने झेंडाच बदलावा ही गोष्ट गमतीची आहे. दुसरी गंमत अशी की, त्यासाठी एक नव्हे, दोन दोन झेंड्यांची योजना करणे हे गोंधळलेल्या मनःस्थितीचे किंवा घसरलेल्या गाडीचे लक्षण आहे. राज ठाकरे व त्यांच्या १४ वर्षे जुन्या पक्षाने मराठी हा मुद्दा घेऊन आधी पक्षाची स्थापना केली, पण आता त्यांचा पक्ष हिंदुत्ववादाकडे वळला असे एकंदरीत दिसते. आडवळणाने वळत आहे असे म्हणणे सोयीचे ठरेल. शिवसेनेने मराठीच्या मुद्द्यावर भरपूर काम करून ठेवले आहे. त्यामुळे मराठी मनास साद घालून हाती काहीच लागले नाही.

संसदीय लोकशाहीत प्रत्येक राजकीय पक्ष आपापले अजेंडे व झेंडे घेऊन काम करीत असतो, पण शिवसेनेसारखा पक्ष ‘एक झेंडा एक नेता’ घेऊन पंचावन्न वर्षे काम करतो आहे. ही एक तपस्या आहे व त्यागही आहे. सत्तेसाठी शिवसेनेने रंग बदलला अशी भाषा करणे हे अकलेची दिवाळखोरी निघाल्याचे लक्षण आहे. शिवसेनेने रंग बदलला असे विचारणाऱ्यांनी स्वतःच्या चेहऱ्यावरील मुखवटे व चेहऱ्यावरचा अनेक रंगी मेकअप तपासून घ्यायला हवा, असा जोरदार टोला शिवसेनेने लगाविला आहे.