Shivsena: भास्कर जाधवांचं भाजपावर टीकास्र; म्हणाले, छोटे पक्ष संपवण्याचा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena: भास्कर जाधवांचं भाजपावर टीकास्र; म्हणाले, छोटे पक्ष संपवण्याचा...

Shivsena: भास्कर जाधवांचं भाजपावर टीकास्र; म्हणाले, छोटे पक्ष संपवण्याचा...

सध्या राज्यातलं राजकारण तापलं आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यातून ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी शिंदे गट आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. छोटे पक्ष संपवण्याचा भाजपचा डाव असल्याचंही जाधव म्हणालेत. पुढे बोलताना ते म्हणाले की, अंधेरी निवडणुकीचे ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर होऊ नये यासाठी भाजपने सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यानंतर ठाकरे गटाने लढून ऋतुजा लटक यांनी कोर्टात जावून राजीनामा मिळवला त्यानंतर भाजपने घाबरून आपला उमेदवारी अर्ज परत घेतला असंही भास्कर जाधव म्हणालेत.

पुढे बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, संजय राठोड यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपद दिलं त्याच भाजपने पूजा चव्हाणच्या आत्महत्येच्या कारणावरून संजय राठोड यांच्यावर सातत्याने टीका केली होती. चित्रा वाघ तेव्हा रोज सकाळी टीव्हीसमोर यायच्या आणि यांच्याबद्दल बोलायच्या. 'उद्धव ठाकरे साहेब, आम्ही तुम्हाला चांगलं मानतो. तुमच्याकडून तरी न्यायाची अपेक्षा आहे. या मुलीला न्याय द्या', असं म्हणायच्या मग आज चित्रा वाघ कुठे आहेत? आज पूजा चव्हाणच्या आत्म्याला शांती मिळाली असेल. कारण चित्रा वाघ यांच्या पक्षाच्या सरकारमध्येच संजय राठोड यांना सन्मानानं मंत्रिमंडळात घेतलं गेलं आहे”, असंही भास्कर जाधव म्हणाले आहेत.

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या अटकेसंदर्भात भास्कर जाधव म्हणाले की, “अनिल देशमुख गेल्या २० महिन्यांपासून जेलमध्ये आहेत. नवाब मलिकही जेलमध्ये आहेत. त्यांच्यावर आरोप लावला की ते दाऊदनं केलेल्या बॉम्बस्फोटात सहभागी होते. त्यानंतर नवाब मलिक अनेकवेळा निवडून आले. मंत्री झाले. 5 वर्ष देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं. पण तेव्हा ते त्यांना बॉम्बस्फोटातले आरोपी म्हणून वाटले नाहीत”, असंही भास्कर जाधव म्हणाले आहेत.