Vidhan Sabha 2019 : शिवसेनेला हव्यात 130 जागा; भाजपकडून मात्र...

मृणालिनी नानिवडेकर 
रविवार, 22 सप्टेंबर 2019

महाराष्ट्रात युती दोन तृतीयांश एवढे बहुमत मिळवेल, अशी खात्री युतीतील नेत्यांना आहे. 

मुंबई : भाजपने मोठ्या भावाची भूमिका घेत उदार अंत:करणाने 120 जागा देण्याची तयारी दाखवली असली, तरी शिवसेनेला 130 पासून माघार घेता येणे अशक्‍य झाले आहे. आम्ही 115 वरून 120 वर येत आहोत, समन्वय महत्त्वाचा आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले असले, तरी शिवसेना हा भावनांवर चालणारा पक्ष आहे, त्यामुळे 130 जागांच्या खाली पडते कसे घेणार, असा प्रश्‍न उद्धव ठाकरे यांच्यासमोर निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात युती दोन तृतीयांश एवढे बहुमत मिळवेल, अशी खात्री युतीतील दोन्ही नेत्यांना आहे. 

देशातील मोदीमय वातावरणात भारतीय जनता पक्षाने किमान 135 जागा स्वबळावर जिंकाव्यात यासाठी प्रयत्न करावेत, असे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले आहे. स्ट्राइक रेट कमाल असावा, यासाठी भाजपचा एकेका जागेचा अत्यंत बारकाईने विचार सुरू आहे. शिवसेनेला न दुखावता त्यांना 120 जागा देण्याची प्राथमिक तयारी भाजपने शनिवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीत दाखवली आहे. भाजपचा आकडा 115 वरून पुढे सरकण्याचा हा पहिलाच प्रसंग असल्याचे समजते. फडणवीस यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी शनिवारी रात्री विभागवार चर्चा केली. त्या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई; तसेच अन्य काही बडे नेते उपस्थित होते. 

आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री? 
शब्द पाळण्यासाठी भाजपने शिवसेनेला सोबत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे; पण जागांबाबत गुडघ्यावर वाकणे शक्‍य नसल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री करण्याची हमीही भाजपने दिल्याचे समजते. शिवसेनेला 120 जागा देण्याची तयारी दाखवण्यात आली आहे. मागील निवडणुकीत 62 जागा जिंकलेल्या पक्षाला 115 ते 120 जागा पुरेशा नाहीत का, असे कालच्या बैठकीत विचारण्यात आल्याचे समजते. 

भाजपचे लक्ष्य मोठे 
भाजपच्या एका नेत्याने आम्ही आमच्या मित्राला योग्य मान देऊ, असे सांगितले. मात्र कमी जागा लढून त्या अधिकाधिक प्रमाणात जिंकणे हे भाजपसमोरचे आव्हान आहे. मित्रपक्ष तसेच शिवसेनेला जागा सोडल्यावर भाजपला केवळ 145 मतदारसंघ लढण्यासाठी उपलब्ध असतील. भाजपचे आगामी सरकारवर वर्चस्व राहावे यासाठी किमान 135 जागा निवडून आणण्याचे लक्ष्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निश्‍चित केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena want in allaince 130 seats Vidhansabha election 2019