स्मारकात असणार शिवचरित्रातील प्रसंग

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

मुंबई - अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या स्मारकाच्या भव्यतेची कल्पना देणारी चित्रफीत आज सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकारांसमोर सादर केली. सर्वांत उंच असलेल्या या स्मारकात शिवचरित्रातील सर्व प्रसंग स्मारकरूपात, तर काही ठिकाणी नाट्यरूपात साकारले जाणार आहेत. हे स्मारक 2019 च्या अखेरीस पूर्ण होणार आहे; मात्र मच्छीमारांनी या स्मारकाला आपला विरोध कायम असल्याचे स्पष्ट केले आहे.

मच्छीमारांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत या कोंडीतून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग निघू शकला नाही. मत्स्य व्यवसायमंत्री महादेव जानकर यांच्या उपस्थितीत यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठकी झाल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या आश्‍वासनावर विचार करण्यास संघटनेने मान्यता दिली होती; मात्र नंतर हा तोडगा अमान्य असल्याचे कळवण्यात आले. आंदोलनकर्त्यांचे नेते दामोदर तांडेल यांचे शिवसेनेशी जवळचे संबंध असल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करावी, अशी विनंती केली आहे. आज पत्रकार परिषदेत सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी तयार केलेल्या स्मारकाच्या प्रारूपाची अत्यंत सुंदर चित्रफीत दाखवण्यात आली. या वेळी स्मारक समितीचे प्रमुख विनायक मेटे उपस्थित होते.

कॉंग्रेसचा विरोध
दरम्यान, भूमिपूजन आयोजित करून फडणवीस सरकार जनतेच्या डोळ्यात धूळ फेकत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. इंदू मिलच्या जागेचे अद्याप हस्तांतर झालेले नाही. अरबी समुद्रातील या स्मारकारसाठीही सर्व परवानग्या मिळालेल्या नाहीत, असा कॉंग्रेस नेत्यांचा आरोप आहे. पुणे मेट्रोच्या उद्‌घाटन समारंभात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मंचावर आमंत्रित करण्यात आले असल्याने या पक्षाचा विरोध काहीसा मावळला आहे, असे बोलले जाते.

शिवसेनेत दोन गट ?
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या समारंभाला उपस्थित राहण्याचे मान्य केले असले, तरी मंचावर भाजप सरकार शिवसेनेला योग्य तो मान देणार नाही, अशी भीती कार्यकर्त्यांना आहे. जलपूजनाला जायचे; पण बीकेसीतील कार्यक्रमाला हजर राहायचे नाही, असा एक पर्याय शिवसेनेत चर्चेला आला आहे. आज मुंबईत राममंदिर स्थानकाच्या उद्‌घाटनप्रसंगी शिवसेनेने अचानक धारण केलेले आक्रमक रूप, तसेच राज्यातील परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि खासदार गजानन किर्तीकर यांनी वापरलेली आक्रमक भाषा, यामुळे शिवसेना जलपूजनाचा समारंभ यशस्वी होऊ देणार काय, याबद्दल प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Web Title: shivsmarak shivcharitra