धक्कादायक! सोलापुरात रेबीजमुळे ९ वर्षीय समर्थचा मृत्यू, १२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झालेला समर्थ एकुलता एक मुलगा; महापालिकेचा अजब दावा, वाचा...

सोलापूर शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाबाबत सातत्याने तक्रारी होत असतानाच भवानी पेठेतील नऊ वर्षीय समर्थ योगीनाथ स्वामी याचा रेबीजमुळे मृत्यू झाल्याने शहरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. निष्पाप बालकाचा जीव गेल्याबद्दल नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने समर्थला कुत्रा चावला नव्हता, तर अपघातातील जखम कुत्र्याने चाटल्याने रेबीजची लागण झाल्याचा दावा केला आहे.
नऊ वर्षीय समर्थ योगीनाथ स्वामी याचा रेबीजमुळे मृत्यू

नऊ वर्षीय समर्थ योगीनाथ स्वामी याचा रेबीजमुळे मृत्यू

sakal

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाबाबत सातत्याने तक्रारी होत असतानाच भवानी पेठेतील नऊ वर्षीय समर्थ योगीनाथ स्वामी याचा रेबीजमुळे मृत्यू झाल्याने शहरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर महापालिका प्रशासनाच्या भटक्या कुत्र्यांवरील नियंत्रणाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, निष्पाप बालकाचा जीव गेल्याबद्दल नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने समर्थला कुत्रा चावला नव्हता, तर अपघातातील जखम कुत्र्याने चाटल्याने रेबीजची लागण झाल्याचा दावा केला आहे.

दीड महिन्यांपूर्वी परिसरातील मोकाट कुत्र्यांच्या भांडणामुळे निर्माण झालेल्या गोंधळात समर्थच्या सायकलचा अपघात होऊन त्याच्या पायाला जखम झाली होती. गुरुवारी (ता. २३) तो नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता. दुपारी घरी आल्यानंतर अचानक त्याला झटके येऊ लागले. प्रथम खासगी रुग्णालयात, त्यानंतर दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी रेबीजची लागण झाल्याचे सांगितले. उपचार सुरू असतानाच शुक्रवारी (ता. २४) सकाळी त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर महापालिका प्रशासनाला नागरिकांनी धारेवर धरले आहे. शहरातील अनेक भागांत कुत्र्यांच्या टोळक्यांचा उपद्रव वाढल्याच्या तक्रारी सातत्याने होत असतानाही प्रभावी उपाययोजना झाल्या नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

कुत्रा चावल्याने नव्हे, जखम चाटल्याने रेबीजची लागण?

महापालिकेच्या म्हणण्यानुसार, समर्थच्या पायाला अपघातात जखम झाली होती. त्यानंतर भटक्या कुत्र्याने ती जखम चाटल्याचे समर्थने कुटुंबीयांना सांगितले होते. रेबीज विषाणू संक्रमित प्राण्याच्या लाळेतून उघड्या जखमेत गेल्यास संसर्ग होऊ शकतो, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. या घटनेचा वैद्यकीय अहवालही तपासला जात आहे.

----------------------------------------------------------------------------

राठी हॉस्पिटलला देणार नोटीस

महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी सांगितले की, समर्थला प्रथम राठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तेथून त्याला यशोधरा हॉस्पिटलमध्ये हलविण्याचा सल्ला देण्यात आला. अशा रुग्णाला शासकीय सर्वोपचार रुग्णालयात पाठविणे अपेक्षित होते. त्यामुळे संबंधित रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे.

-------------------------------------------------------------------------

आई-वडिलांना रेबीज प्रतिबंधक लस

समर्थच्या मृत्यूनंतर खबरदारीचा उपाय म्हणून त्याच्या आई-वडिलांना रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. रेबीजग्रस्त रुग्णाच्या निकट संपर्कातील व्यक्तींना आवश्यक वैद्यकीय सल्ला व प्रतिबंधात्मक उपचार देण्यात येत असल्याची माहिती डॉ. माने यांनी दिली.

-------------------------------------------------------------------

१२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झालेला एकुलता एक मुलगा

योगीनाथ आणि ज्योती स्वामी दाम्पत्याला लग्नानंतर तब्बल १२ वर्षांनी समर्थचा जन्म झाला होता. एकुलत्या एका मुलाच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भवानी पेठ परिसरातही या घटनेमुळे शोककळा पसरली असून नागरिकांनी कुटुंबाला धीर दिला.

---------------------------------------------------------------

‘दुर्घटना’ की ‘व्यवस्थेचे अपयश’?

शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना त्यावर ठोस कारवाई झालेली नाही. स्वामी कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही हलाखीची असून वडील गंभीर आजाराने त्रस्त असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर जखमेवर वेळेवर उपचार होऊ शकले नाहीत, अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान, या घटनेनंतरही स्वामी कुटुंबाची विचारपूस करण्यासाठी कोणतेही लोकप्रतिनिधी न आल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. शुक्रवारी अनेक पदाधिकारी मंत्र्यांच्या दौऱ्यात व्यस्त होते. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या वेदनांकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे का, असा सवाल परिसरातून उपस्थित केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

A 79-year-old woman died after a speeding tempo hit a motorcycle near Doodhad on the Karmad–Ladsawangi road. The driver fled the scene, while locals blamed the badly damaged road, where three people have lost their lives in the last two months.
Pune court sentences two convicts to life imprisonment until natural death in 2016 Talegaon rape case
Solapur child dies due to rabies
Sangli gang rivalry killed investigation
Marathi News Esakal
www.esakal.com