
महाराष्ट्रातून अण्णा म्हणजेच श्रीपती खंचनाळे लढत देणार होते. त्यामुळे सर्वांचेच लक्ष लागले होते. त्यांच्याविरोधात मैदानात होता पंजाबचा बत्तासिंग. तो पंजाब केसरी होता. त्याच्या तुलनेत अण्णांना कमजोर गणले जात होते.
अहमदनगर - महाराष्ट्राचे दिग्गज पैलवान श्रीपती खंचनाळे यांनी अखेरचा श्वास घेतला असला तरी त्यांनी दिलेल्या योगदानामुळे आखाडा कायम गजबजलेला राहणार आहे. ते देशातील दुसरे आणि महाराष्ट्राचे पहिले हिंदी केसरी किताबाचे मानकरी ठरले. हा किताब पटकावल्यानंतरही त्यांनी देशातील आणि महाराष्ट्रातील अनेक आखाडे गाजवले.
या स्पर्धेनंतर कराड येथे झालेल्या अधिवेशनात त्यांनी आनंद शिरगावकर यांना दोनच मिनिटांत आस्मान दाखवून या किताबाचे मानकरी ठरले. १९५८, ६२ आणि ६५मध्ये झालेल्या अॉल इंिडया चॅम्पियन स्पर्धाही जिंकल्या. पैलवानांनी नेमका कोणता आहार घेतला पाहिजे, याविषयी ते फार सजग होते.
नुरा, रटाळकुस्तीचा होता राग
नैसर्गिक औषधाविषयीही त्यांना खूप ज्ञान होते. पाकिस्तानमध्ये जाऊनही त्यांनी अनेक कुस्त्या जिंकल्या. थोरले गामा पैलवान यांचे बंधू इमामबक्ष यांचीही त्यांनी भेट घेतल्याची आठवण जुन्या मंडळींकडून सांगितली जाते.
कुस्तीत शिरलेल्या अपप्रवृत्तींचा त्यांना फार राग होता. नुरा कुस्तीविषयी तर त्यांची मते जहाल होती. रटाळ आणि बरोबरीत सुटलेली कुस्ती त्यांना आजिबात मान्य नव्हती. त्यांच्याविषयी कुस्ती मल्लविद्या महासंघाचे संस्थापक, वस्ताद गणेश मानगुडे आठवण सांगतात, रटाळ कुस्ती होत असेल तर ते स्वतः मैदानात जाऊन पैलवानांना खडसावत. शरीर थकल्यानंतरही त्यांनी आपला नियम मोडला नाही. एकदा समोर रटाळ कुस्ती होत असताना त्यांनी संबंधित पैलवानांना काठीच फेकून मारली होती. त्यांना कु्स्ती क्षेत्रात खूप मान होता.
दिग्गज मल्ल घडवले
कुस्तीतून निवृत्तीनंतरही त्यांनी मार्गदर्शकाची भूमिका पार पाडली. कोल्हापुरातील शाहुपुरी तालमीतून महाराष्ट्र केसरी दिनकर दह्यारी, महंमद हानिफ, हिंदकेसरी हजरत पटेल यांच्यासह अनेक दिग्गज मल्ल घडवले. शेवटच्या श्वासापर्यंत ते मैदानासोबत जोडलेले होते.
असे रंगले हिंद केसरीचे मैदान...
दिल्लीतील नेहरू स्टेडिअममध्ये दुसऱ्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यावेळी उत्तरेतील पैलवानांचे कुस्तीत वर्चस्व होते. विशेषतः पंजाब आणि हरियाणा ही त्यात राज्य अग्रेसर होती. महाराष्ट्रातून अण्णा म्हणजेच श्रीपती खंचनाळे लढत देणार होते. त्यामुळे सर्वांचेच लक्ष लागले होते. त्यांच्याविरोधात मैदानात होता रूस्तुम ए पंजाब बत्तासिंग. त्याच्या तुलनेत अण्णांना कमजोर गणले जात होते. बत्तासिंगच जिंकणार असा कयास केला जात होता.
हेही वाचा - तीन माजी, विद्यमान अध्यक्षांना पुन्हा व्हायचेय शनि देवस्थानचे विश्वस्त
सह्याद्रीने दिली हिमालयाला टक्कर
ही लढत परमुलखात होत असल्याने अण्णांसाठी जमेची बाजू नव्हती. सर्व वातावरण बत्तीसिंगच्या बाजूने होते. मात्र, अण्णा मनाने कणखर होते. बत्तासिंगला आपण हिमालय आहोत, आपल्याला हा सह्याद्री काय करणार अशाच भ्रमात होता. दोघे मल्ल मैदानात उतरले. सुरूवातीला दोघांनी एकमेकांची ताकद आजमावली. बराच वेळ खडाखडी सुरू होती.
कुस्ती बरोबरीत सोडली
बत्तासिंगला अण्णा कुठेच कमी पडत नव्हते. घुटना हा अण्णांचा आवडता डाव. तसे ते सर्वच प्रकारच्या डावांत माहीर होते. बत्तासिंगही अधूनमधन चढाई करायचा. परंतु त्याला अण्णा तुल्यबळ असल्याचे वाटायला लागले. तब्बल अर्धातास ही कुस्ती चालली. या कुस्तीला पंच होते महाबली सतपालचे गुरू हनुमानसिंग. शेवटी आयोजकांनी ही बरोबरीत सुटल्याचे जाहीर केले. मात्र, अण्णांना आयोजकांचा राग आला. मी कुस्ती करू असे ते आयोजकांना सांगत होते. परंतु त्यांचे कोणी ऐकायला तयार नव्हते. हा नकाल अण्णांना मान्य नव्हता. ते लगेच राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्याकडे गेले. त्यांनी कुस्ती निकाली होईपर्यंत लढणार असल्याचे सांगितले. निकाली कुस्तीसाठी राष्ट्रपतींकडे धाव घेणारा हा पहिलाच पैलवान. राष्ट्रपतींनाही त्यांची धडाडी आवडली.
राष्ट्रपती आले मैदानात
राष्ट्रपतींनीही आयोजकांना पुन्हा मैदान सुरू करण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी मैदान सजले. लोकांचाही हुरूप वाढला. अण्णा विजेच्या चपळाईने मैदानात डाव टाकत होते. बत्तासिंग चिडलेला होता. जेमतेम पाच दहा मिनिटे झाली असतील तोच अण्णांनी आपला आवडता घुटना डाव बत्तासिंगवर टाकला. आणि मैदानात एकच जल्लोष झाला. बत्तासिंग मैदानात लोळत दिवसा चांदण्या मोजत राहिला. आणि अण्णा महाराष्ट्राचे पहिले हिंद केसरी ठरले. राष्ट्रपतींनी हस्तक्षेप केला नसता तर कदाचित महाराष्ट्राला हा मान मिळाला नसता किंवा विभागून तो किताब घ्यावा लागला असता. जिगरबाजपणामुळे ते पैलवानांसोबत देशाच्या स्मरणात राहतील.... कुस्तीचे अभ्यासक, वस्ताद गणेश मानगुडे यांनी "ई सकाळ"सोबत बोलताना अण्णांची ही आठवण सांगितली.