सिंधुताई सपकाळ यांना अखेरचा निरोप; महानुभव पंथाप्रमाणे अंत्यसंस्कार | Sindhutai Sapkal Funeral Updates | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sindhutai Sapkal Funeral Updates

सिंधुताई सपकाळ यांना अखेरचा निरोप; महानुभव पंथाप्रमाणे अंत्यसंस्कार

पुणे - अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचे मंगळवारी (ता.४) रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास ह्रदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन झाले. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. सुमारे दीड महिन्यांपूर्वी सिंधूताई यांना हार्नियाच्या त्रासामुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या आजारावरील उपचारासाठी त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतरही रुग्णालयातच त्यांच्यावर उपचार चालूच होते. मात्र मंगळवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास उपचार चालू असतानाचा त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

सिंधूताई सपकाळ यांना शासकीय इतमामात सलामी (Sindhutai Sapkal Funeral Updates)

पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांच्यावर आज पुण्यात अंत्यसंस्कार झाले. त्याआधी त्यांना शासकीय इतमामात सलामी देण्यात आली. सिंधुताई यांच्या पार्थिवावर महानुभव पंथाप्रमाणे दफनविधी करण्यात आले. पुण्यातील ठोसर पागा इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.

सिंधुताई सपकाळ यांचे पार्थिव आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मांजरी बुद्रुक येथील सन्मती बालनिकेतन येथे आणण्यात आले. त्यावेळी नागरिकांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती.

आभाळ फाटलं माई, पोरका झाला समा..

सिंधूताई सपकाळ यांच्या जाणं अनेक जणांना चटका लावून जाणारं आहे, अश्यातच पुण्यातील तुळशीदास मेटकरी यांनी माईंवर एक कविता केलीय.

सिंधूताईंनी निराधारांना आधार दिला. त्याचबरोबर शिक्षणाच्या माध्यमातून अनेकांना उभे केले. विशेषत: मुलींचे शिक्षण आणि त्यांनी स्वावलंबी व्हावे यासाठीचे त्यांचे योगदान महाराष्ट्र विसरू शकणार नाही.

- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

हेही वाचा: सिंधूताईंच्या जाण्यानंतर पंतप्रधान मोदीही भावूक; म्हणाले...

वैयक्तिक जीवनात अनेक अडचणी असूनही सिंधूताईंनी आपले जीवन हजारो अनाथ मुलांच्या सेवेसाठी समर्पित केले. त्या प्रेम आणि करुणेच्या प्रतीक होत्या.

-भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

वात्सल्यसिंधू, राज्यातील अनेक अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने आज महाराष्ट्र खरोखरच एका ज्येष्ठ समाजसेविकेला मुकला आहे. त्यांच्या निधनाने मातृतुल्य व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा: वर्धेतील नवरगाव सिंधुताईंची जन्मभूमी; जिल्ह्यात केले बरेच कार्य

सिंधूताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी वर्धा येथे झाला होता. त्यांनी पुणे जिल्ह्यातील पुरंदर (Purandar) तालुक्यातील कुंभारवळण गावात ममता बालसदन या संस्थेची स्थापना केली होती. या संस्थेच्या माध्यमातून त्या अनाथ मुलांना सांभाळत असत. या संस्थेत मुलांना सर्व प्रकारचे शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यात येते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील आणि ते स्वतःच्या पायावर खंबीरपणे कशी उभी राहतील, यासाठी त्यांचे प्रयत्न असायचे. सिंधूताई सपकाळ यांनी त्यांच्या जीवनात अनाथ व बेवारस मुलांना आधार देण्याचे फार मोठे काम आयुष्यभर केले आहे.

हेही वाचा: पद्मश्री ते अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार वाचा सिंधुताईंचा प्रवास

आतापर्यंत हजारो अनाथ मुला-मुलींना आश्रय देत, या मुलांची म्हणजेच अनाथांची माय अशी त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली होती. महिलांवरील अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे कामही त्यांनी आयुष्यभर केले. त्यांना आतापर्यंत संस्था, संघटना आणि राज्य व केंद्र सरकारच्यावतीने विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री या पुरस्कारानेही सन्मानित केले आहे.

सिंधूताई यांना छातीचा हार्निया झाला होता. यासाठी त्यांच्यावर दीड महिन्यांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु उपचार सुरु असतानाच त्यांना हदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाल्याचे गॅलक्झी केअर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी सांगितले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top