'सिंधुताईं'वरील 'त्या' मीमवर का होतेय चर्चा?

'सिंधुताईं'वरील 'त्या' मीमवर का होतेय चर्चा?

पद्मश्री सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचे मंगळवारी रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर 5 जानेवारी दुपारी बाराच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सिंधुताई यांच्यावर पुण्यातील गॅलेक्सी केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यानंतर गेल्या महिन्याभरापासून त्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर सध्या एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. सिंधुताई सपकाळ यांचा मृत्यू झाल्याची बातमी जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर एक मीम (Meme on Sindhutai Sapkal) प्रसिद्ध झालं ज्यानंतर हा वाद सुरु झाला आहे.

'सिंधुताईं'वरील 'त्या' मीमवर का होतेय चर्चा?
जीम, ब्युटी पार्लर आणि सलूनसाठी अटींसह परवानगी; राज्य सरकारचे नवे आदेश

काय आहे हा वाद?

सिंधुताई सपकाळ यांच्या जाण्याच्या अवघ्या एका तासानंतर त्यांच्यावर टीका करणारं एक मीम सुदर्शन जगताप या मीमरने शेअर केलं. त्यांच्या जाण्यानंतर एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र हळहळत असताना त्यांच्यावर अशी शेरेबाजी करण्याची इतकी घाई कशासाठी? अशा आशयाच्या प्रतिक्रिया त्यांच्या मीमवर येऊ लागल्या. दुसऱ्या दिवशी यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी सविस्तर मत व्यक्त करत अशा मीमविरोधात भूमिका मांडली. त्याच आशयाची पोस्ट सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनीही पोस्ट केली. महिलांवर होणाऱ्या बलात्कारामागे अंगभर कपडे न घालण्याचं कारण असल्याच्या आशयाचं विधान त्यांनी खूप वर्षांआधी एका भाषणात केलं होतं. महिलांनी अंगभर कपडे घालावेत, या त्यांच्या आवाहनावरुन त्यावेळीही बरीच चर्चा झाली होती. त्यांच्या मृत्यूनंतर झालेल्या वादाला याच त्यांच्या वक्तव्याची पार्श्वभूमी आहे. या वादामध्ये दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर ताशेरे ओढल्याचं पहायला मिळालं आहे. मीमर सुदर्शन जगताप याने त्याला 'विकृत' ठरवणाऱ्या हेरंब कुलकर्णी आणि विश्वंभर चौधरी यांच्यावरही मीम बनवून शेअर केल्याचं दिसून आलं.

काय होतं 'त्या' मीममध्ये?

सिंधुताईंच्या जाण्यानंतर शेअर केलेल्या त्या मीममध्ये त्यांची तुलना अपर्णा रामतीर्थकर यांच्याशी करण्यात आली होती. 'एक शुगर कोटेड संस्कृतीरक्षक' असा सिंधुताईंचा उल्लेख असणारं हे मीम वादग्रस्त ठरलं. अनेकांनी मीम आक्षेपार्ह नसून ते शेअर करण्याची वेळ मात्र चुकली असल्याचंही सांगितलं. सिंधूताईंविषयीची दूसरी बाजू बरेचदा वाचली आहे, ऐकली आहे. महिलांच्या पेहरावाबद्दलची त्यांची मते पण ही सगळ्याच जुन्या पिढितल्या महिलांसारखीच आहेत म्हणून सोडून द्यायला हवं. हे सगळं असलं तरीही त्यांचं काम मात्र नाकारता येणार नाही आणि त्यांनी केलेल्या कामापुढे हे सगळे अवगुण शुल्लक आहेत, अशा स्वरुपाच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या तर काहींनी या मीमवरच आक्षेप घेत मीम करणाऱ्या मीमरला विकृत ठरवलं.

'सिंधुताईं'वरील 'त्या' मीमवर का होतेय चर्चा?
राज्य शासनावर सदाभाऊ खोत यांचा निशाणा; म्हणाले,ग्लास भरून ठेवायचा...

हेरंब कुलकर्णी काय म्हणाले?

'मीम्स की विकृती?' या शिर्षकाखाली हेरंब कुलकर्णी यांनी आपलं मत मांडलंय. त्यांनी म्हटलंय की, शेअर केलेले हे मीम सिंधुताई यांच्या मृत्यूनंतर दोन तासाने केले आहे इतके हे संतापजनक आहे.संपूर्ण महाराष्ट्र सिंधुताई च्या मृत्यूने हळहळ व्यक्त करत असताना यांना ही अभिव्यक्ती सुचत होती...एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर काही काळ त्याव्यक्तीचे गुण आठवावेत,आदरांजली वाहावी आणि नसेल त्याविषयी प्रेम तर गप्प बसावे, अशा व्यक्तीकडे दुर्लक्ष करावे..पण या विकृती खूपच वाढल्या आहेत.कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तीच्या मृत्यूची बातमी आली की लगेच हे सुरू होते...याचा अर्थ मूल्यमापन करूच नये का ? पण त्यासाठी किमान काही काळ जाऊ दिला पाहिजे पण विकृत व्यक्तींना हे समजत नाही.

पुढे ते म्हणाले की, मीम करणाऱ्या तरुणांना जगात काहीच मंगल नाही पवित्र नाही सगळे विषय खिल्ली उडवण्याचे आहेत व जगात फक्त विसंगतीचा आहेत अशी एक विचित्र विकृत मानसिकता बनली आहे. कोणताही प्रसिद्ध व्यक्ती हा काळ्या आणि पांढरा रंगाचा नसतो. अशा वेळी कोणत्या व्यक्तीला कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या मानायचे हे कळले पाहिजे.. सिंधुताईनी संभाळलेली १०००मुले लक्षात ठेवायची की संस्कृती च्या बाबत केलेले भाषण लक्षात घ्यायचे हा विवेक असायला हवा, असं त्यांनी म्हटलंय.

दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनीही या प्रकरणी आपलं मत मांडत या मीम प्रकरणावर भाष्य केलंय. त्यांनी म्हटलंय की, पेरता येतो म्हणून द्वेष पेरायचा. बाबा आमटेंपासून सिंधुताईंपर्यंत लोक सेवा करतात म्हणजे नेमकं काय करतात याची कोणतीही माहिती नसतांना, त्यातल्या वेदना आणि त्यागाची लांब लांब पर्यंत कल्पनाही करण्याची क्षमता नसतांना फेसबुकवर काहीतरी खर्डेघाशी करायची. गुंड राजकारण्यांपुढे एक शब्द बोलायची हिंमत नसतांना इकडे सामाजिक कार्यकर्त्यांवर मात्र मृत्युनंतरही अश्लाघ्य टीका करायची, घाणेरडे मीम्स बनवायचे याला जर कोणी अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणत असेल तर खड्ड्यात पडो ती अभिव्यक्ती. याच न्यायानं उद्या रस्त्यावर लोकांना लुटणाऱ्यांना घटनादत्त 'व्यवसाय स्वातंत्र्य' आहे असंही म्हणाल! तरूण मुलांची अभिव्यक्ती म्हणून विकृतपणाचं कौतुक होऊ शकत नाही. बेजबाबदार अभिव्यक्ती पेक्षा व्यक्त न होणं चांगलं म्हणलं पाहिजे. सिंधुताईंसारख्या सेवाभावी लोकांचं तेही मरणोत्तर ट्रोलींग करणाऱ्यांनी एकदा आरशात बघावं. फक्त घाण पसरवणारा एक चेहरा आरश्यात पाहण्याचं समाधान मिळवावं, असं त्यांनी म्हटलंय.

'सिंधुताईं'वरील 'त्या' मीमवर का होतेय चर्चा?
'गांभीर्याने मास्क वापरलात, तर लॉकडाऊन लावणार नाही'

मीमकर्त्याचं काय आहे म्हणणं?

मीमकर्ता सुदर्शन जगताप यांनी आपलं मीम डिलीट केलं नाही. याउलट ते आपल्या मतावर ठाम राहिलेले दिसतात. अनेक तरुणांनीही या प्रकरणात त्यांची बाजू घेतली आहे. काहींनी मीममध्ये काही आक्षेपार्ह नसून त्याचं टायमिंग चुकलं असल्याचंही म्हटलं आहे. या सगळ्या प्रकरणात वेगवेगळ्या प्रकारची मत-मतांतरे दिसून आली असली तरी मीमकर्ता आणि त्याच्या समर्थकांना 'विकृत' असं लेबल लावून गुन्हेगार ठरवणं पसंत पडलेलं नाही.

मीमर सुदर्शन जगताप याने आपलं मत मांडताना म्हटलंय की, स्त्रीवर होणारा बलात्कार हा तिच्या कपड्यांमुळे झालेला आहे, असं जेंव्हा आपण म्हणतो तेंव्हा आपण स्त्रीला म्हणजे व्हिक्टीमलाच ब्लेम करत असतो. थोडक्यात आपण रेप कल्चरला नकळत प्रोत्साहन देत असतो. हजारो लाखो फॉलोअर्स असलेली व्यक्ती आपल्या भाषणामधून अशा प्रकारचे स्टेटमेंट देत असते तेंव्हा त्या स्टेटमेंटला समाजमान्यता मिळत असते. कळत नकळत अश्या लहान सहान गोष्टींमधून नविन पीढी समोर हे संस्कार म्हणून बिंबवलं जातं असतं. आपल्या आधीच्या पिढीतील लोकांची आणि आपली विचारसरणी, दृष्टीकोन आणि आकलन ह्यांमध्ये खूप फरक आहे.

पण एखाद्या व्यक्तीस हजारो लाखों लोकं आदर्श म्हणून पाहत असतात, त्यांच्याकडून असे प्रो रेप कल्चर स्टेटमेंट वारंवार येत असतील तर त्या व्यक्तीचे वय, पद, प्रतिष्ठा, कार्य जरी मोठं असलं तरी विचारसरणी, दृष्टीकोन आणि आकलन याची चिकित्सा करणं गरजेचं असतं. एकदा का त्या व्यक्तीस समाजात देवत्व प्राप्त झालं की अश्या गोष्टी अवघड होऊन बसतात, असं त्याने म्हटलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com