प्रस्तावित बोरामणी विमानतळाच्या धावपट्टीची जागा ‘माळढोक’साठी आरक्षित! केंद्राने प्रस्ताव फेटाळल्यावर २०२१ नंतर महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाकडून फेरप्रस्ताव नाही

बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ५७५ हेक्टर जमीन संपादित झाली. पण, धावपट्टीच्या मध्यभागी येणाऱ्या ३३.७२ हेक्टर जमिनीच्या (माळढोकचा अधिवास असलेल्या जमिनीच्या) संपादनाच्या परवानगीसाठी महाराष्ट्र राज्य विमानतळ विकास प्राधिकरणाने २०२१ मध्ये पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभागाच्या नागपूर कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविला होता. तो प्रस्ताव फेटाळल्यानंतर पुढे विमानतळ विकास प्राधिकरणाने कोणतीही कार्यवाही केली नसल्याची बाब समोर आली आहे.
Solapur-Boramani airport

Solapur-Boramani airport

sakal

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ५७५ हेक्टर जमीन संपादित झाली. पण, धावपट्टीच्या मध्यभागी येणाऱ्या ३३.७२ हेक्टर जमिनीच्या (माळढोकचा अधिवास असलेल्या जमिनीच्या) संपादनाच्या परवानगीसाठी महाराष्ट्र राज्य विमानतळ विकास प्राधिकरणाने २०२१ मध्ये पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभागाच्या नागपूर कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविला होता. तो प्रस्ताव फेटाळल्यानंतर पुढे विमानतळ विकास प्राधिकरणाने कोणतीही कार्यवाही केली नसल्याची बाब समोर आली आहे.

देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रयत्नांतून २००८ मध्ये बोरामणी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचा निर्णय झाला. पुढच्या वर्षीपासून भूसंपादनाला सुरुवातदेखील झाली. १४ वर्षांत सुमारे सव्वाशे कोटी रुपये खर्च करून तब्बल एक हजार ४३७ एकर जमीन संपादितही झाली. मात्र, ८४ एकर जमिनीच्या संपादनात माळढोकचा अडथळा आहे. २०१८ मध्ये ‘वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’तर्फे (भारतीय वन्यजीव संस्था) माळढोकच्या अधिवासाचा सर्व्हे झाला. त्यावेळी सोलापूरच्या बोरामणी परिसरात (त्या ३३.७२ हेक्टरमध्ये) माळढोक मादीचा सतत अधिवास असल्याचे आढळून आले. त्यांनी तसा अहवाल केंद्राच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाला दिला होता.

या पार्श्वभूमीवर २०२१ मध्ये महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने बोरामणी विमानतळासाठी ३३.७२ हेक्टर जमिनीच्या संपादनाच्या परवानगीसाठी दिलेला प्रस्ताव फेटाळण्यात आला होता. त्यानंतर विमानतळ विकास प्राधिकरणाने पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभागाच्या नागपूर कार्यालयाकडे कोणताही प्रस्ताव पाठविलेला नाही, असे अधिकारी सांगतात. यामुळेच आता ही जागा ‘एमआयडीसी’साठी मिळावी, यासाठी मंत्रालय स्तरावरून प्रयत्न सुरू असल्याचेही सूत्रांनी सांगितले. कारण, ३३.७२ हेक्टर क्षेत्र वगळून आणि जिथे इको सेन्सिटिव्ह झोन आहे, त्या ठिकाणी लॉजिस्टिक पार्क करून उर्वरित जागा ‘एमआयडीसी’साठी वापरता येते, असे एमआयडीसी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन्स अन्‌...

भारतीय वन्यजीव संस्थेचा सर्व्हे, नान्नज अभयारण्यातील मादी माळढोकचा बोरामणी परिसरातील अधिवास या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचा प्रस्ताव पाच वर्षांपूर्वीच फेटाळण्यात आला आहे. माळढोक पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने त्याच्या संवर्धनासंदर्भात सुप्रिम कोर्टानेदेखील मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यामुळे सोलापूरच्या वन विभागाने पत्रव्यवहार करूनही महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने फेरप्रस्ताव पाठविलेला नाही.

फेरप्रस्ताव पुन्हा दाखल नाहीच

बोरामणी येथील प्रस्तावित विमानतळाकरिता लागणाऱ्या ३३.७२ हेक्टर जमिनीच्या संपादनाचा प्रस्ताव पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभागाच्या नागपूर कार्यालयाने २०२१ मध्ये फेटाळला. त्यानंतर महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाकडून फेरप्रस्ताव पाठविण्यात आलेला नाही. वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा सर्व्हे, माळढोकची घटती संख्या, सुप्रिम कोर्टाच्या गाइडलाइन्स आणि माळढोकच्या संवर्धनासाठी केंद्र स्तरावरील प्रयत्न, अशी कारणे त्यामागे असू शकतात.

- अजित शिंदे, सहायक वनसंरक्षक, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com