कौशल्य आधारित कृषी उद्योगच टिकतील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जानेवारी 2017

पुणे - सततची दुष्काळी स्थिती, जादा कोरडवाहू क्षेत्र, जागतिक तापमानबदल अशा समस्या वाढत आहेत. त्यामुळे शेती व शेतीआधारित उद्योग हे कौशल्याशी निगडित असतील, तरच ते भविष्यात टिकतील, असे मत कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी व्यक्त केले.  

पुणे - सततची दुष्काळी स्थिती, जादा कोरडवाहू क्षेत्र, जागतिक तापमानबदल अशा समस्या वाढत आहेत. त्यामुळे शेती व शेतीआधारित उद्योग हे कौशल्याशी निगडित असतील, तरच ते भविष्यात टिकतील, असे मत कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी व्यक्त केले.  

सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर (एसआयएलसी)ने रविवारी आयोजित केलेल्या कृषी ज्ञान सोहळ्याच्या उद्‍घाटनप्रसंगी कार्यक्रमात देशमुख बोलत होते. ॲग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण, अहिरराव इन्फ्रास्ट्रक्चरचे पार्टनर निखिल अहिरराव, एसआयएलसीच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर व कार्यक्रमप्रमुख अमोल बिरारी व्यासपीठावर होते. कृषी आयुक्त देशमुख म्हणाले, ‘‘कृषी विभागाच्या योजनांना उभारी देणारे कौशल्य विकासाचे उपक्रमच एकप्रकारे एसआयएलसीकडून राबविले जातात.’’ 

चव्हाण म्हणाले, की शेतकरी व शेतीआधारित व्यावसाय, उद्योगाला कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देणारे माध्यम नव्हते. त्यामुळे सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्या संकल्पनेतून एसआयएलसीचा जन्म झाला. शेतीव्यतिरिक्त इतर अनेक क्षेत्रांत एसआयएलसीकडून प्रशिक्षण दिले जात असले तरी कृषी क्षेत्राला मध्यवर्ती ठेवत ४५ प्रकारचे कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम उपलब्ध करून दिलेले आहेत.अहिरराव इन्फ्रास्ट्रक्चरचे वरिष्ठ व्यवस्थापक टी. सी. बनकर, न्यू हॉलंडचे सेवाप्रमुख परेश प्रधान, केएफ बायोप्लॅन्टसचे महाव्यवस्थापक मनीष साकुरकर, गरवारे वॉलरोपचे तंत्र व्यवस्थापक सोमनाथ जाधव यांनी सादरीकरण केले. 

‘व्यावसायिक शेतीकडे वळा’
भारतापेक्षा मोठा भूभाग असलेल्या ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या तीन कोटी असल्यामुळे २ हजार एकर मालकी असलेले शेतकरी तेथे आहेत. भारतात ७८ टक्के शेतकरी पाच एकर मालकीच्या आत आहेत. त्यात पुन्हा जमिनीचे तुकडे होत असल्यामुळे यांत्रिक शेतीलादेखील मर्यादा येत आहेत. त्यामुळे कौशल्यावर आधारित व्यावसायिक शेतीकडे शेतकऱ्यांना वळावे लागेल, असे मत देशमुख यांनी व्यक्त केले.

Web Title: Skills-based agricultural