सामाजिक संतुलन जुळवताना कसरत

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 23 एप्रिल 2018

मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची निवड 29 एप्रिल रोजी होणार असताना, पक्षाला विविध सामाजिक समीकरणांचे संतुलन राखण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे चित्र आहे.

मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची निवड 29 एप्रिल रोजी होणार असताना, पक्षाला विविध सामाजिक समीकरणांचे संतुलन राखण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे चित्र आहे.

विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सलग चार वर्षे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळली असून, आता त्यांच्या जागी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील व शशिकांत शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, पक्षामध्ये सुनील तटकरे हे ओबीसी चेहरा असल्याने व आगामी निवडणुकांत ओबीसी मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रतिनिधित्व मिळावे, असा एक मतप्रवाह सुरू झाला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर पश्‍चिम महाराष्ट्रातील नेत्यांचा प्रभाव असला, तरी राज्यातील इतर प्रादेशिक विभाग व सामाजिक संतुलन राखण्याचे मोठे आव्हान देखील आहेत. मराठा नेत्यांचे वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादीने ओबीसी, दलित व इतर सामाजिक घटकांना प्रतिनिधित्व देण्याची संधी डावलू नये, असाही एक मतप्रवाह आहे.

मागील चार वर्षे पक्षासाठी अत्यंत आव्हानात्मक होती. 2014 च्या लोकसभा व विधानसभेतील पराभवानंतर पक्षाचे संघटन सतत मजबूत करण्यासाठीचे कार्यक्रम राबवताना विद्यमान कार्यकारिणीचे योगदान मोठे मानले जाते. सध्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधात इतर मागासवर्ग, दलित, अल्पसंख्याक व आदिवासी समाजात अविश्‍वासाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीमध्ये मराठाबहुल पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी मराठा चेहरा दिल्यास या समाजाला नकारात्मक संदेश जाण्याचीही भीती आहे.

नवीन चेहरा देण्याचा मतप्रवाह
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार, विधानसभेतील गटनेते जयंत पाटील हे पश्‍चिम महाराष्ट्रातीलच नेते आहे. विधान परिषद विरोधी पक्ष नेतेपद धनंजय मुंडे यांच्याकडे असून हा एक अपवाद आहे. त्यामुळे, प्रदेशाध्यक्षपदही पश्‍चिम महाराष्ट्राकडेच दिल्यास पक्षाचे केंद्रीकरण झाल्याचा संदेश जाऊ शकतो, असाही एक मतप्रवाह आहे. दरम्यान, 29 एप्रिलच्या निवडीत पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नवीन चेहरा देताना प्रादेशिक व सामाजिक संतुलन सांभाळूनच व्यक्‍तीची निवड करावी, असाही मतप्रवाह पक्षातील काही नेत्यांचा आहे.

Web Title: Social balance NCp Politics